अंगणवाड्यांना उतरती कळा
By Admin | Updated: June 12, 2016 02:13 IST2016-06-12T02:13:07+5:302016-06-12T02:13:07+5:30
मुलांना शाळेत जाण्याची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अंगणवाड्यामध्ये केवळ या ‘खा’ आणि ‘जा’ अशीच शिकवण दिली जात आहे.

अंगणवाड्यांना उतरती कळा
पालकांचा कल नर्सरीकडे : विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटतेय
पुसद : मुलांना शाळेत जाण्याची आवड निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या अंगणवाड्यामध्ये केवळ या ‘खा’ आणि ‘जा’ अशीच शिकवण दिली जात आहे. तर दुसरीकडे स्पर्धेच्या युगात आपली पाल्य मागे पडायला नको म्हणून प्रत्येक जण नर्सरीमध्ये दाखल करताना दिसतो. यामुळे तालुक्यातील अंगणवाडींना उतरती कळा लागल्याचे दिसत आहे.
बालकांना आरोग्यासोबतच पूर्व प्राथमिक शिक्षण मिळावे यासाइी शासनाने गावोगावी अंगणवाड्या सुरू केल्या आहे. परंतु या अंगणवाड्या फक्त बालकांना या खा आणि जा पुरत्याच मर्यादित दिसत आहे. जागरुक पालक आपल्या पाल्यांना अंगणवाडीमध्ये न पाठवता खासगी शाळेमध्ये केजी, नर्सरीसाठी पैसा खर्च करून पाठवत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या घटत आहे.
शासनाने प्रत्येक गावात अंगणवाडी सुरू केली आहे. या अंगणवाड्यामध्ये बालकाला दररोज पोषण आहार दिला जातो. इतके सर्व असूनही येथे प्रशिक्षित अंगणवाडी सेविका शिकवत नाहीत. त्यामुळे आपल्या पाल्याचे भविष्य खराब होऊ नये. स्पर्धेमध्ये तो मागे राहू नये म्हणून पालक पाल्यांना सरकारी अंगणवाडीमध्ये न पाठविता खासगी शाळेत पाठविणे पसंद करीत आहेत.
पूर्वी नर्सरी, केजी या शाळा फक्त शहरापुरत्या मर्यादित होत्या. परंतु कॉन्व्हेंटचे पीक ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. लहान खेड्यापासून १० ते २० किमीचा प्रवास करत पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये पाठवत आहेत.
यात जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांचा दर्जा सुधारल्याशिवाय जनतेची मानसिकता बदलणार नाही आणि दिवसेंदिवस जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांना उतरती कळा लागणार यात शंका नाही. (तालुका प्रतिनिधी)