कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार, पेन्शनसाठी रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:07 IST2017-09-08T22:07:11+5:302017-09-08T22:07:32+5:30
कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार आणि पेन्शनसाठी आधार अपडेट आणि थम्ब सक्तीचा केला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने आधार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून परिस्थिती स्फोटक बनत आहे.

कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार, पेन्शनसाठी रांगा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार आणि पेन्शनसाठी आधार अपडेट आणि थम्ब सक्तीचा केला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने आधार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून परिस्थिती स्फोटक बनत आहे.
कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. त्यामुळे शेतकरी सेतू केंद्रांवर गर्दी करीत आहे. मात्र मशीन थम्ब स्वीकारत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनाही अर्ज भरताना थम्ब आणि मोबाईल नंबर तातडीने दाखल करण्याचे आदेश आहे. निराधारांनाही आधार लिंक झाल्याखेरीज मानधन मिळणार नाही. पेन्शनधारकांची केस आधार लिंक झाल्यानंतरच सबमिट होणार आहे.
या सर्वांना त्वरित आधारकार्ड जोडण्याच्या सूचना आहेत. परिणामी सर्वांनीच आधार केंद्रांकडे धाव घेतली. सर्वांनाच आधार लिंक करणे सक्तीचे असल्याने त्यांची धावपळ सुरू आहे. आपला क्रमांक तत्काळ लागावा म्हणून अनेक जण अगदी पहाटेपासूनच आधार केंद्रावर गर्दी होत आहे. तथापि जिल्हा मुख्यालयात एकच आधार अपडेट केंद्र आहे. जिल्ह्यातील नागरिक या केंद्रावर गर्दी करीत आहे. मात्र दरदिवशी केवळ १५० अर्ज स्वीकारले जात असल्याने इतरांना रिकाम्या हाताने परतावे लागते. यामुळे जनसामान्यांत आक्रोष वाढत असून परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होत आहे.
रात्री १० नंतर संकेत स्थळाला गती
जिल्ह्यातले सर्व केंद्रांवर जाऊन आल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून अनेक नागरिक जिल्हा मुख्यालयातील केंद्राकडे धाव घेत आहे. त्यामुळे येथे एकच गर्दी उडते. त्यातही संगणकाची गती धीमी असते. रात्री १० वाजनानंतर संकेतस्थळाची गती वाढते. त्यामुळे गाव पातळीवर रात्री संकेत स्थळावर गर्दी होत आहे. सावळी सदोबामध्ये रात्री १२ वाजतानंतर पोलीस केंद्र बंद करायला लावते. त्यामुळे रात्र जागूनही अनेकांना परत जावे लागते. त्यामुळे जिल्हा पातळीवर आधार केंद्र आणि अर्ज वितरणाची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.
कर्जमाफीचे अर्ज दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबर ही तारीख शासनाने घोषित केली. यामुळे प्राधान्याने शेतकºयांचेच अर्ज घेतले जावे, अशा सूचना काढण्यात आल्या आहे. तसे फलक लावले गेले आहे.
- नरेंद्र फुलझेले
निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ