नरबळीप्रकरणी सात जणांना फाशीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 05:24 IST2017-08-15T05:24:34+5:302017-08-15T05:24:37+5:30
यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशी तर अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

नरबळीप्रकरणी सात जणांना फाशीची शिक्षा
यवतमाळ : चोरंबा गावात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या सपना पळसकर या बालिकेच्या नरबळीप्रकरणी सोमवारी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशी तर अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
मनोज लाल्या आत्राम (१९), देवीदास पुनाजी आत्राम (२२), यादवराव तुकाराम टेकाम (५०), पुनाजी महादेव आत्राम (५४), रामचंद्र गणपत आत्राम (७०), मोतीराम महादेव मेश्राम (५४), यशोदा पांडुरंग मेश्राम (६०) अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दुर्गा शिरभाते हिला नरबळीच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत पाच वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
>सर्व आरोपी सपनाचे नातेवाईक
आरोपी देवीदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते. सपना पळसकर (७) हिचे २४ आॅक्टोबर २०१२ रोजी दसºयाच्या दिवशी घरासमोरून अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपींनी प्रसाद म्हणून तिचे रक्तप्राशन केले होते.