Daydream of Paur-Pangri Pandan road | पहूर-पांगरी पांदण रस्त्याची दैनावस्था
पहूर-पांगरी पांदण रस्त्याची दैनावस्था

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे हाल : पावसामुळे बिकट, लोकवर्गणीतून दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : लगतच्या पहूर ते पांगरी शेतशिवाराकडे जाणारा पांदण रस्ता दयनीय झाला आहे. पोळ्यापासून दररोज पाऊस सुरू असल्याने रस्त्याची दुरावस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.
हा पांदण रस्ता पूर्णत: काळ्या मातीचा आहे. पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. या चिखलात बैलबैंडी चाकापर्यंत फसत आहे. चिखलाने माखलेल्या रस्त्यावरुन पायदळ चालणे कठीण झाले आहे. शेतात खत कसे न्यावे, मजूर काम करायला कसे जातील, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. स्थानिक प्रशासनाच्या निद्रीस्त अवस्थेमुळे पालकमंत्री पांदण योजना कुचकामी ठरत आहे. ‘आमच्या गावात आमचे सरकार’ म्हणत काही होतकरू तरूण शेतकºयांनी पुढाकार घेत लोकवर्गणीतून ट्रॅक्टर भाड्याने करून विकत दगड, मुरुम आणून दिवसभर श्रमदान करून रस्त्यावर दगड पसरविले. त्यावर मुरूम टाकून पांदण रस्ता दुरुस्त केला. मात्र दगड, मुरूम आणणारा ट्रॅक्टरच चिखलात फसल्याने त्यांची निराश झाली. अखेर ‘साथी हाथ बढाना’ म्हणत युवा शेतकºयांनी ‘दे धक्का’ करून ट्रॅक्टर कसाबसा चिखलातून बाहेर काढला.
लोकवर्गणी व श्रमदानातून पांदण रस्ता तूर्तास ये-जा करण्यायोग्य झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तात्पुरती व्यवस्था झाली. यामुळे शेतकरी व महिला या उपक्रमाचे कौतुक करीत आहे. ‘गाव करी, ते राव न करी’ याची प्रचिती ग्रामस्थांनी आणून दिली. एकीचे बळ त्यांनी दाखवून दिले. मात्र प्रशासन अद्याप उदासीन आहे. त्यामुळे संतापही व्यक्त केला जात आहे. पांदण रस्ता दुरुस्तीसाठी गुणवंत तिरपुडे, विजय जंगले, मधुकर तिरपुडे, यशवंत शेंडे, गजानन तिरपुडे, देविदास डांगे, पांडुरंग राठोड, बाळू राठोड, विठ्ठल कंठाणे, गजानन जांभुळकार, किसन पडोळे, सुरेश पडोळे आदी शेतकºयांनी पुढाकार घेतला.


Web Title: Daydream of Paur-Pangri Pandan road
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.