सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसमोर अंधार
By Admin | Updated: October 18, 2014 23:01 IST2014-10-18T23:01:39+5:302014-10-18T23:01:39+5:30
वर्षानुवर्षे कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्याचा विषय तर दूरच, अंगावरील कर्ज कसे फेडावे, याचीच काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे.

सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसमोर अंधार
पुसद : वर्षानुवर्षे कापूस विकून दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यावर्षी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळी साजरी करण्याचा विषय तर दूरच, अंगावरील कर्ज कसे फेडावे, याचीच काळजी शेतकऱ्यांना सतावत आहे.
गेल्या दीड वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने शेती उत्पादनापासून वंचित राहावे लागत आहे. मागिल वर्षी आधी अतिवृष्टी आणि नंतर परतीचा पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडले नाही. यावर्षी आधी पावसाने दडी मारली. त्यामुळे दुबार व तिबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली. पाण्याचे सर्व स्त्रोत आटल्यामुळे पिकांना पाणी देता येऊ शकले नाही. त्यातच पावसाळ्याच्या शेवटी काही प्रमाणात चांगला पाऊस झाल्याने अनेकांच्या शेतातील पिके बहरली होती. परंतु आॅक्टोबर हिटमध्ये ही पिकेसुद्धा वाया गेली. अनेकांच्या सोयाबीन पिकांवर विविध किडींचा प्रादूर्भाव झाला. पावसाने तर डोळेच वटारले. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे तेसुद्धा भारनियमनामुळे पिकांना पाणी देऊ शकले नाही.
अद्यापही शेतातील कापूस घरी आला नाही तर सोयाबीनने पूर्णत: दगा दिला. त्यामुळे चार दिवसांवर आलेली दिवाळी कशी साजरी करावी, हा मोठा प्रश्न आहे. भारतीय सणांच्या परंपरेतील सर्वात मोठा व सर्वांच्या जीवनात प्रकाश आणणारा सण म्हणजे दिवाळी. गोरगरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वचजण आपापल्या परिने हा सण साजरा करतात. वर्षभराची खरेदी याच काळात केली जाते.
लेकी, सुणा मोठ्या आनंद व उत्साहाने या सणाची वर्षभर वाट पाहतात. कारण त्यांना या काळात माहेरची आस लागलेली असते. परंतु ‘नेमोचि येतो पावसाळा’याप्रमाणे यंदाही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करावी, हा प्रश्न आहेच.
तालुक्यात यंदा सुरूवातीपासूनच निसर्गाची अवकृपा दिसून आली. सोयाबीन, उडिद, मूग, ज्वारी आदी पिकांची कुठे दुबार तर कुठे तिबार पेरणी करावी लागली. पावसाळ्याच्या सुरवातीची नक्षत्रे कोरडी गेल्याने पेरणी उशीरा झाली. मात्र तब्बल दोन महिने पावसाने दडी मारल्याने याचा परिणाम शेती उत्पन्नावर झाला. उडीद, मूग, सोयाबीन, तूर, ज्वारी, कापूस आदी पिकांचे उत्पन्नच दिसले नाही. सोयाबीन व कापसांसारख्या महत्वपूर्ण आणि नगदी पिकांनीसुद्धा दगा दिला. यंदा सोयाबीन पोत्यांनी नव्हे तर किलोनी विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सायोबीनसारखीच कापसाचीही अवस्था आहे. साधारणत: दिवाळीपूर्वी कापूस शेतकऱ्यांच्या घरी येतो. कापूस विकूनच शेतकरी दिवाळी दरवर्षी आनंदात साजरी करतात. परंतु यंदा कापसाचा उतारा नाही. त्यातही अपरिपक्क बोंडे फुटत आहे. शेतकऱ्यांच्या घरी कापूस आला नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. याउलट अनेकांनी दिवाळीपूर्वीच निवडणुकीमुळे दिवाळी साजरी केली आहे. शेतकऱ्यांकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष आहे. (प्रतिनिधी)