धरणे, आंदोलनाचा वार ठरला बुधवार

By Admin | Updated: September 3, 2015 02:07 IST2015-09-03T02:07:37+5:302015-09-03T02:07:37+5:30

शासनाच्या कामगार धोरणाविरूद्ध बुधवारी विविध कामगार संघटनांनी बंद पुकारला होता. यात हजारो सदस्यांनी सहभाग घेतला.

Dare, the agitation will be held on Wednesday | धरणे, आंदोलनाचा वार ठरला बुधवार

धरणे, आंदोलनाचा वार ठरला बुधवार

धरणे, निदर्शने, चक्काजाम : बंदमुळे झाले वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान, झरी-पांढरकवडा येथेही आंदोलन
वणी : शासनाच्या कामगार धोरणाविरूद्ध बुधवारी विविध कामगार संघटनांनी बंद पुकारला होता. यात हजारो सदस्यांनी सहभाग घेतला. या संपामुळे वेकोलिचे कोट्यवधींचे नुकसान झाले. वणी, झरी, मारेगाव व पांढरकवडा तालुक्यात आंदोलन झाल्याने बुधवार दिवस आंदोलनाचा ठरला.
विविध १२ मागण्यांसाठी हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला होता. इंटक, एच.एम.एस., आयटक, सीटू या प्रमुख चार कामगार संघटनांनी व सिस्टा, एस.टी.एन.टी.कॉन्सिलने या संपात सहभाग घेतला. तालुक्यातील १२ कोळसा खाणींमधील बहुतांश कामगरांनी या संपात सहभाग घेतला. त्यामुळे वेकोलिच्या कोळसा खाणींत शुकशुकाट दिसून येत होता. काही कर्मचारी मात्र भितीपोटी या संपात सहभागी झाले नाही. चार संघटनेच्या कामगारांनी एकत्र येऊन आपल्या एकतेचा परिचय दिला.
यावेळी कामगारांनी शासनाच्या धोरणाविरूद्ध घोषणाबाजी केली. भारतीय मजदूर संघटना या संपापासून अलिप्त होती. त्यामुळे या संघटनेच्या काही सदस्यांनी वेकोलित हजेरी लावली. उकणी, पिंपळगाव, निलजई, निलजई-२, नायगाव व मुंगोली खाणींमध्ये मोजकेच कामगार कामावर गेले. संप शांततेत पार पडावा म्हणून वणी एरियाचे महाप्रबंधक राज दास यांनी घुग्गुस येथे मुक्काम ठोकला होता. त्यांनी सकाळी ८ वाजता बेलोरा चेकपोस्टजवळ कामगारांची भेट घेऊन संवाद साधला. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पवार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वणी नॉर्थ एरियाचे महाप्रबंधक डी.एम.गोखले यांनी संपूर्ण खाणींची माहिती घेत परिस्थितीवर नजर ठेवली. काही कोळसा खाणीत मात्र काम सुरू करण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.
या संपात वणी तालुक्यातील डाक विभाग व दूरसंचार विभागाच्या जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. एम.एफ.पी.ई. संघटनेतर्फे शहरातील डाक कार्यालय बंद ठेवण्यात आले. वणी क्षेत्रातील २४ डाक कार्यालय, शिंदोला परिसरातील चार, मारेगाव येथील १६, झरी येथील नऊ व पांढरकवडा येथील एक कार्यालय पूर्णत: बंद होते. शहातील तीन बँकांनीही संपात सहभाग घेतला. त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प पडले होते. (प्रतिनिधी)
वनोजादेवी, पाथरी येथे चक्काजाम आंदोलन
वणी : महागाई व भ्रष्टाचारी राजवटीपासून दिलासा देण्याच्या नावाखाली सत्तेत बसलेल्या मोदी सरकारने सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप करीत भाजक आणि माकपतर्फे वनोजादेवी, पाथरी येथे रस्त रोको आंदोलन करण्यात आले. कामगार कायद्यात बदल करणे, दलित व आदिवासीचा कल्याण योजनांत कपात, भूमीअधिग्रहण अध्यादेश काढणे, वनधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांना लाभ न देणे, असे प्रकार केल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे बुधवारी वनोजादेवी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. वनोजादेवी-मार्डी व पाथरी मार्गाजवळ दोन तास रस्ता रोको आंदोलन झाले. आंदोलनाचे नेतृत्व कुमार मोहरमपुरी, शंकर केमेकर, रामभाऊ जिड्डेवार, बंडू गोलर यांनी केले. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार व ठाणेदारांन देण्यात आले. या आंदोलनात नांदेपेरा, डोल मच्छिंद्रा, हिवरा, राजूर (कॉलरी), शेलू, रांगणा, भुरकी, मारेगाव, नवरगाव, झरपट, चिंचाळा, बोटोणी, पाथरी, खैरगाव, वाघदरा, मदनपूर, हिवरी, अर्जुनी येथील कार्यकर्ते सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)
झरी तहसीलसमोर धरणे
झरी : भारतीय कम्युनिस्ट पक्ष, डावे पक्ष तसेच पुरोगामी संघटनांतर्फे येथील तहसीलसमोर बुधवारी निदर्शने करून धरणे देण्यात आले. बुधवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला. यात भाकप, माकपसह डावे पक्ष व पुरोगामी संघटनांनी सहभाग घेतला. झरी तालुक्यातील कामगार, मजूर व शेतकऱ्यांनीही विविध मागण्यांसाठी या आंदोलनात सहभाग घेतला. येथील तहसीलसमोर निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले. निदर्शकांनी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. या आंदोलनात राजू पेंदोर, वासुदेव गोहणे, मनोज काळे आदींच्या नेतृत्वात कामगारांनी सहभाग घेतला.
पांढरकवडा येथे एसडीओ कार्यालयावर मोर्चा
पांढरकवडा : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंचातर्फे विविध मागण्यांकरिता शंकर दानव व चंद्रशेखर सिडाम यांच्या नेतृत्वात बुधवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
वन जमिनीवरील अतिक्रमण, वनाधिकार कायद्याच्या कलम ११ मधील नियम १३ प्रमाणे रहिवासी दाखला व ज्येष्ठ नागरिकांचे बयाण मान्य करून दावे पात्र करावे, गैर आदीवासींना तीन पिढ्यांचा रहिवासी दाखल्याचा पुरावा मान्य करून गैर आदिवासींनासुद्धा कायद्याचा लाभ मिळावा, वनहक्क समित्या नियमानुसार स्थापन कराव्या, वनहक्क दावे फेरपडताळणीसाठी दाखल करून घ्यावे, पाणी, वीज व आरोग्य व्यवस्थेचे खासगीकरण बंद करावे, दलित, आदिवासी व समाजकल्याण योजनांमध्ये करण्यात आलेली कपात रद्द करावी, यासह इतर मागण्यासांठी येथील मित्र क्रीडा मंंडळाच्या मैदानावरून शहरातील प्रमुख मार्गाने मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. तेथे उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देताना शंकर दानव, चंद्रशेखर सिडाम, बळीराम मेश्राम, पांडुरंग टेकाम, उरकुडा गेडाम व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Dare, the agitation will be held on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.