दिग्रस तालुक्यात उभ्या सोयाबीन पिकाचे नुकसान
By Admin | Updated: October 23, 2016 02:00 IST2016-10-23T02:00:30+5:302016-10-23T02:00:30+5:30
यंदा शेतकऱ्यांना पावसाने मोठा दगा दिला. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दिग्रस तालुक्यात उभ्या सोयाबीन पिकाचे नुकसान
पावसाचा फटका : पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी
दिग्रस : यंदा शेतकऱ्यांना पावसाने मोठा दगा दिला. त्यामुळे तालुक्यातील सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचा तातडीने पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, असा टाहो तालुकाभरातील सोयाबीन उत्पादक फोडत आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक सुरुवात केली. तत्पूर्वी हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. नगदी पीक आणि चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने यंदा मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करण्यात आली. सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे पीकही जोमात आले होते. परंतु मध्यंतरी पावसाने दीर्घ काळ दडी मारली. यात उभे सोयाबीन वाळण्याची प्रक्रिया सुरु झाली. कसेबसे सोयाबीन जगविण्यात शेतकऱ्यांनी यश मिळविले. मात्र सप्टेंबरच्या मध्यात परतीचा पाऊस सुरु झाला. हा पाऊसही धडाकेबाज असल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊ लागले. सोयाबीनच्या झाडांना शेंगा लगडलेल्या असताना सततच्या पावसामुळे या शेंगांना कोंब फुटले आणि शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या.
तालुक्यातील चिरकुटा या गावातील सोयाबीन उत्पादकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शामसुंदर विठ्ठलराव इरतकर यांनी आपल्या संपूर्ण शेतात यंदा सोयाबीनचीच पेरणी केली होती. पीक परिपक्व होऊन काढणीस आले होते. परंतु सतत सुरू असलेल्या पावसाने शेंगांना कोंब येऊन पूर्णत: नुकसान झाले. शामसुंदर इरतकर यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दिग्रस शाखेतून रिलायन्स कंपनीचा पीक विमा काढला होता. या विमा कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता तो क्रमांक सतत व्यस्त येत आहे. त्यामुळे निराश झालेल्या या शेतकऱ्याने तहसीलमध्ये धाव घेत निवेदन दिले. नुकसानीची तत्काळ मोका पाहणी करून आर्थिक सहाय्य मिळवून द्यावे, अशी मागणी तहसीलदारांकडे केली.
शामसुंदर इरतकर यांच्या प्रमाणेच तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची अवस्था आहे. सोयाबीनचे पीक हाताशी आलेले असताना निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. यामुळे तालुकाभरातील शेतकरी संकटात सापडले आहे. दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)
दिवाळीवर अंधाराचे सावट
बेभरवश्याच्या पावसामुळे यंदा दिवाळीपूर्वी कापसाचे पीक शेतकऱ्यांच्या घरात येऊ शकले नाही. शिवाय काही अपवाद वगळल्यास अद्याप कापसाची खरेदीही सुरू झाली नाही. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात सोयाबीनचे पीक चांगल्या अवस्थेत दिसल्याने सोयाबीन विकूनच दिवाळी साजरी करण्याच्या मन:स्थितीत शेतकरी होते. परंतु परतीच्या पावसाने हाताशी आलेले सोयाबीनचे पीक नासवले. शिवाय कसेबसे सोंगणी केलेल्या सोयाबीनला हमी भावापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती आहे.