२0 लाखांचा बांध मातीमोल

By Admin | Updated: May 28, 2014 00:03 IST2014-05-28T00:03:22+5:302014-05-28T00:03:22+5:30

चुकीच्या आणि अतांत्रिक पध्दतीने बांधण्यात आलेल्या मातीनाला बांधावरील सुमारे २0 लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तालुक्याच्या दत्तापूर (निरंजन माहूर) येथे

Dam of 20 lakh rupees | २0 लाखांचा बांध मातीमोल

२0 लाखांचा बांध मातीमोल

कळंब : चुकीच्या आणि अतांत्रिक पध्दतीने बांधण्यात आलेल्या मातीनाला बांधावरील सुमारे २0 लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तालुक्याच्या दत्तापूर (निरंजन माहूर) येथे पाणी साठविण्यासाठी बांधलेल्या मातीनाला बांधाची ही स्थिती आहे. सदर बांध बारमाही कोरडा राहात असल्याने मूळ उद्देशालाच मूठमाती मिळाली आहे.

दत्तापूर मंदिर शिखर आणि परिसरात विविध विकास कामे केली जात आहे. यावर कोट्यवधी रुपये खर्च होत आहे. विधानसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांच्या पुढाकारात होत असलेली ही कामे त्यांच्याच राजकीय कार्यकर्त्यांना दिली जात आहे. अशाच पध्दतीने याठिकाणी वनविभागाच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी दोन मातीनाला बांध निर्माण करण्यात आले. यासाठी २0 लाख रुपये खर्च करण्यात आला. या बंधार्‍याचे काम दोन राजकीय पदाधिकार्‍यांना वाटून देण्यात आले होते. या पदाधिकार्‍यांनी कंत्राटदारांना हाताशी धरून बंधार्‍याचे काम थातुरमातूर पूर्ण केले. वन अधिकार्‍यांनीही त्यांना तेवढीच साथ दिली. त्यामुळे सुरुवातीपासूनच या बंधार्‍यामध्ये पाणीच थांबलेले नाही, ही बाब कोणीही नाकारणार नाही.

बांधकाम करताना बंधार्‍याच्या भिंतीसाठी चर (सीओटी) खोदणे आवश्यक होते. तसेच भिंत उभारताना काळ्या मातीचा थर देणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदारांनी तेथूनच काढलेला मुरुम खोदून भिंत उभी केली. या कामासाठी कुठलेही तांत्रिक कौशल्य वापरण्यात आले नाही. सदोष कामामुळे बंधार्‍यात पाणी थांबत नाही. यात दोषी कोण, हा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. यातील एका बंधार्‍यात पावसाळ्यात थोडेफार पाणी असते. परंतु तेही लवकरच आटते.

दत्तापूर येथील विकास कामांवर प्रा.पुरके यांचे जातीने लक्ष असते. महिन्यातून अनेकदा ते या कामांची पाहणी करतात. असे असतानाही त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून कामाची गुणवत्ता राखली जात नाही. आमदारांचे कार्यकर्ते म्हणून अधिकारीही दबावात राहतात. त्यामुळे चुकीचे काम झाले तरी, अधिकारी जाब विचारण्याचे टाळतात. त्यामुळे आता प्रा.पुरके यांनीच कार्यकर्त्यांना आवर घालण्याची वेळ आली आहे. ही मागणी जनतेतूनही होत आहे. जनतेच्या पैशाचा चुराडा होवू नये अशी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Dam of 20 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.