दाभडीतील समस्यांचे गाठोडे पंतप्रधान कार्यालयात
By Admin | Updated: May 28, 2014 00:02 IST2014-05-28T00:02:24+5:302014-05-28T00:02:24+5:30
लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी ज्या दाभडी गावातून ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातील मतदारांना संबोधित केले तेथील विविध समस्यांचे गाठोडे पत्रस्वरूपात गावकर्यांनी पंतप्रधान

दाभडीतील समस्यांचे गाठोडे पंतप्रधान कार्यालयात
ज्ञानेश्वर मुंदे - दाभडी (यवतमाळ) लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींनी ज्या दाभडी गावातून ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरातील मतदारांना संबोधित केले तेथील विविध समस्यांचे गाठोडे पत्रस्वरूपात गावकर्यांनी पंतप्रधान कार्यालयात पाठविले आहे. दाभडी ग्रामपंचायतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला. सोबतच गावातील समस्या सोडविण्याबाबत त्यांनी २0 मार्च २0१४ रोजी दिलेल्या आश्वासनाचे स्वतंत्र पत्राद्वारे त्यांना स्मरणही करून देण्यात आले. हे पत्र मंगळवारी २७ मे रोजी पंतप्रधान कार्यालयाकडे रवाना करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील दाभडी चार हजार लोकसंख्येचे गाव. तेथे विजेची समस्या गेल्या कित्येक वर्षांपासूनची आहे. आताही केवळ सहा तास वीज पुरवठा होतो. त्यामुळे शेतकर्यांना सिंचन करताना अडचणी येतात. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात गेलो तर अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असे सरपंच संतोष टाके यांनी सांगितले. आर्णी तालुक्यात सर्वाधिक गारपिटीचा तडाखा दाभडीला बसला. मात्र मदत अतिशय तुटपुंजी मिळाली आहे. दीडशे लोकांना तर एकछदामही मदत मिळाली नाही. तोंड पाहून सर्वे झाल्याचा आरोप आता गावकरी करीत आहे. पूर्वीपासून या गावात काँग्रेस विचारसरणी रुजलेली. प्रत्येक निवडणुकीत गाव काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला भरभरुन मते दिली. मात्र विकासाचा पत्ताच नाही. आजही या गावात विविध समस्या आहे. शेतकरी आत्महत्यांसाठी गाव कुप्रसिद्ध आहे. तब्बल १४ शेतकर्यांनी कर्जबाजारीपणातून मृत्यूला कवटाळले. अशा या गावात २0 मार्च २0१४ रोजी नरेंद्र मोदी आले. त्यांनी शेतकर्यांशी संवाद साधला. चाय पे चर्चा कार्यक्रमातून देशभरातील शेतकर्यांच्या समस्या दाभडीतून ऐकल्या. एवढेच नाही तर एका शेतालाही भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली. नरेंद्र मोदींच्या या आश्वासनावर गावकर्यांचा पक्का विश्वास बसला. लोकसभा निवडणुकीत अख्खे गाव मोदींच्या पर्यायाने भाजपाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत ११२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी भाजपाचे हंसराज अहीर यांना ८0३ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांना केवळ १२६ मतांवर समाधान मानावे लागले. तर आपचे वामनराव चटप यांना या गावात केवळ तीन मते मिळाली. गावकर्यांनी मोदींच्या शब्दांवर विश्वास ठेवत भरभरुन मते दिली.