फेक अकाऊंट बनवून महिलेला त्रास देणारा पोलिसांच्या जाळ्यात

By विशाल सोनटक्के | Updated: April 24, 2023 14:26 IST2023-04-24T14:14:13+5:302023-04-24T14:26:59+5:30

सायबर पोलिसांची कारवाई, समाज माध्यमावर आठ अकाऊंट होती उघडली

Cyber police action in police net for harassing woman by creating fake account | फेक अकाऊंट बनवून महिलेला त्रास देणारा पोलिसांच्या जाळ्यात

फेक अकाऊंट बनवून महिलेला त्रास देणारा पोलिसांच्या जाळ्यात

यवतमाळ : आपल्या नावे विविध समाज माध्यमावर फेक अकाऊंट बनवून त्रास दिला जात असल्याची तक्रार यवतमाळ येथील एका महिलेने सायबर पोलिसांकडे केली होती. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाआधारे पुणे येथील विकास तोफसिंग राठोड याचा शोध घेतला असता त्याने सदर महिलेचे  फेसबुकवर सात तर इन्स्टाग्रामवर एक अशी आठ फेक अकाऊंट उघडल्याचे निष्पन्न झाले. या तरुणाविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

यवतमाळ येथील एक महिला २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायबर पोलिस ठाण्यात आली. आपल्या नावे फेक अकाऊंट बनवून अज्ञात इसम मानसिक त्रास देत असल्याची तिने तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर ठाण्यात कलम २९२ भादंविसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला. फेसबुक तसेच इन्स्टाग्रामकडूनही माहिती मागविण्यात आली.

या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पुण्यातील वाकड भागात राहणारा विकास तोफसिंग राठोड या इसमाने सदर फेक अकाऊंट बनविल्याचे निष्पन्न झाले. त्यास नोटीस पाठवून सायबर पोलिस ठाण्यात बोलाविण्यात आले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून त्याने या महिलेप्रमाणेच अन्य महिलांच्या नावाने फेक अकाऊंट  उघडले का याचा तपास आता पोलिस घेत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनीष दिवटे, सपोनि विकास मुंढे, एएसआय डेरे, पोलिस शिपाई सतीश सोनोने व अजय निंबाळकर यांनी केली.

Web Title: Cyber police action in police net for harassing woman by creating fake account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.