नोटा बादमुळे व्यवहार थांबले, बाजारपेठ ठप्प
By Admin | Updated: November 10, 2016 01:34 IST2016-11-10T01:34:50+5:302016-11-10T01:34:50+5:30
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर बुधवारी बाजारपेठेत मोठा गोंधळ उडाला.

नोटा बादमुळे व्यवहार थांबले, बाजारपेठ ठप्प
१०० रूपयांची नोट ठरली लाख मोलाची : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, बाजारहाटात मजुरांची बोंबाबोंब
यवतमाळ : ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बंद केल्यानंतर बुधवारी बाजारपेठेत मोठा गोंधळ उडाला. छोट्या नोटावाले सर्वाधिक श्रीमंत ठरल्याचे चित्र बुधवारी बाजारात बघायला मिळाले. त्यामुळे करकरीत कारमधून आलेले श्रीमंतही कोमेजलेल्या चेहऱ्याचे दिसत होते. फुटपाथ व सायकलवर असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांचा चेहरा मात्र आनंदाने फुललेला होता. चाट भांडारपासून ते सुवर्ण बाजारपेठ या निर्णयाने प्रभावित झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री घोषणा करताच बुधवारी शेतकरी अडचणीत सापडले. सोयाबीन हंगाम, कापूस वेचाई आणि दिवाळी यात शेतकरी कुटुंबाकडील पैसा आता संपला आहे. रबी हंगाम तोंडावर आहे. दिवाळीमुळे १५ दिवस शेतमाल बाजारपेठ बंद होती. सोमवारी सोयाबीन खरेदी झाली. मंगळवारी काटा झाला. रात्री शेतकऱ्यांना चुकारा मिळाला. मंगळवारी सोयाबीन नेणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार समितीत मुक्काम ठोकावा लागला. बुधवारी सोयाबीनचा लिलाव झाला. मात्र बँका बंद असल्याने शेतकऱ्यांन पैसे भेटलेच नाही. परिणामी रिकाम्या हाताने शेतकरी घरी परतले. मात्र मजुरांच्या आक्रोशाचा त्यांना सामना करावा लागला.
शेतमाल विकला, पण पैसे भेटले नाही, हे सांगितल्यानंतरही मजूर त्यांचे म्हणणे ऐकणाच्या मनस्थितीत नव्हते. बुधवारी बाजार असणाऱ्या गावांमध्ये तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. बाजाराला पैसे न मिळाल्यामुळे तेथे शेत मालक आणि मजूर राजकारणातील विरोधकांप्रमाणे भांडत होते. यामुळे गावखेड्यांत प्रचंड तणावाची स्थिती होती. पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले. मात्र अचानक झालेल्या घोषणेने बेसावध शेतकरी अडचणीत सापडले.
बाजार समिती गुरूवारी बंद
बाजार समितीचा संपूर्ण व्यवहार बँकांवर विसंबून असतो. बुधवारी बँका बंद होत्या. यामुळे व्यापाऱ्यांना शेतमालाची खरेदी केल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे देता आले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आले. बँकांचे धोरण, सोयाबिनची उचल आणि विविध कारणाने गुरवारी एक दिवस बाजार समिती बंद राहणार आहे. शुक्रवारी बाजारपेठ सुरू राहणार आहे. शनिवार ते सोमवार पर्यंत बाजार समिती पुन्हा बंद राहील, अशी माहिती बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक यांनी दिली.
तिबेटीयन बांधवानी ठेवली बाजारपेठ बंद
स्वेटर विक्रीकरीता आलेले तिबेटीयन बांधव केंद्राच्या निर्णयाने चांगलेच अडचणीत सापडले. स्वेटर, जाकेट आणि विविध वस्तुंच्या किमती ५०० च्या वर आहे. मात्र नवीन नोटा बाजारात नाही. खरेदीदारांकडे नाही. यामुळे भांडणची स्थिती निर्माण झाल्याने तिबेटीयन बांधवांचे दुकान बुधवार आणि गुरूवारी बंद राहणार असल्याचे तेनजीन यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सरकारी दवाखान्यात ५०० च्या नोटा चालेना !
पंतप्रधानांनी सरकारी दवाखान्यात ५०० व १००० च्या नोटा चालतील, असे स्पष्ट केले. मात्र यवतमाळात त्याविरूद्ध अनुभव आला. सकाळी १० पर्यंत ५०० व १००० च्या नोटा चालल्या. मात्र ११ च्या सुमारास ओपीडी आणि नोंदणी कक्षाबाहेर ५०० व हजाराच्या नोटा चालणार नसल्याचे बोर्ड लागले. गोंधळ वाढताच हे बोर्ड काढण्यात आले. मात्र ५०० च्या नोटा आणणाऱ्या रूग्णांना आधारकार्डचा नंबर मागण्यात आला. नंबर न देणाऱ्या रूग्णांचे पैसे घेतले गेले नाही. यामुळे चिल्लरच्या प्रतीक्षेत गर्भवती महिलांना ताटकळत थांबावे लागले. लखमापूरच्या आशासेविका वर्षा मढवे आपल्यासोबत वैशाली आडे आणि आरती राठोड या मातांना घेऊन दवाखान्यात आल्या होत्या. मात्र ५०० ची नोट न स्विकारल्याने त्यांना दुपारी ४ वाजतापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.
चाटभंडार चालकाने लावले बोर्ड
शहरातील ‘चौपाटी’ही या निर्णयाने प्रभावीत झाली. ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्विकारल्या जाणार नाही, असे बोर्ड चाटभंडार चालकांनी लावले. तेथे येणाऱ्या ग्राहकाला प्रथम चिल्लर विचारण्यात आली. नंतरच त्यांची आॅर्डर घेतली गेली.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपासमार
वैद्यकीय शिक्षण, अभियंता, बिपीएड शिक्षण घेणारे विद्यार्थी यवतमाळात मोठ्या संख्येने आहे. या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा जबर फटका बसला. त्यांचे कुटुंबीय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकतात. शिष्यवृत्तीचे पैसे खात्यातच असतात. जशी आवशकता भासेल, तसे ते पैसे एटीएममधून काढतात. मात्र अचानक झालेल्या निर्णयाने विद्यार्थ्यांना एटीएमवरून पैसे काढता आले नाही. परिणामी चाटभांडार, भोजनालय आणि इतर ठिकाणाहून त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. बाहेरगावच्या बहुतांश विद्यार्थ्यांची उपासमार झाली.
पिंपळखुटी चेकपोस्टवर वाहतूक ठप्प
आंध्रप्रदेशातून महाराष्ट्रात येताना पिंपळखुटी येथे आरटीओ चेकपोस्ट आहे. या चेकपोस्टवर ५०० आणि १००० च्या नोटा न घेतल्याने जड वाहनधारकांचा गोंधळ उडाला. ११ वाजताच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प पडली. नंतर ठरावीक काळात टोल न घेण्याचे आदेश आले. यातून अखेर कोंडी फुटली.
८ कोटींची उलाढाल व
६४ लाखांचे चलान ठप्प
दररोज शासकीय व खासगी बँका आणि शासकीय कार्यालये यातून महिन्याला २५० ते ३०० कोटींची जिल्ह्यात उलाढाल होते. दर दिवसाला ही उलाढाल ८ कोटींच्या घरात असते. ही उलाढाल बुधवारी थांबली. स्टॅम्प खरेदीसाठी जिल्ह्यात दर दिवसाला ६४ लाखांचे चलान भरले जाते. ज्या दिवशी चलान भरले जाते, त्यानंतर स्टँम्प उपलब्ध होतात. मात्र बुधवारी ही सर्व उलाढाल ठप्प पडली. हा परिणाम पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
भाजी मंडीत उडाला गोंधळ
रात्री भाजी विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसला. सकाळी भाजीची खरेदी झाली. व्यापाऱ्यांनी ५०० आणि १००० च्या नोटा दिल्या. मात्र शेतकऱ्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. १०० च्या नोटा नसल्याने शेतकऱ्यांना अखेर उधारीवर माल विकण्याची वेळ ओढवली. (शहर वार्ताहर)
सराफा बाजारात शुकशुकाट
पाचशे व हजाराच्या नोटा बाद झाल्याने यवतमाळचा सराफा बाजार ठप्प असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले. सराफ व्यापारी असोसिएशनचे प्रमुख सारंग भालेराव यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सराफा बाजारातील आर्थिक आवक-जावक ठप्प आहे. सोने विक्रीसाठी आलेल्यांना आम्ही मंगळवारचा धनादेश देत आहो. बँका सलग सुट्यांमुळे मंगळवारीच उघडणार असल्याने त्यापूर्वी खात्यात रक्कम जमा केली जाईल. सोन्याची खरेदी करणाऱ्यांकडूनही मंगळवारचा धनादेश घेतला जात आहे. हा धनादेश क्लिअर झाल्यानंतरच त्यांना सोने देण्यात येईल. मात्र त्याआधी सोने हवे असल्यास त्यांना हमी दराची (गॅरंटर) मागणी केली जात आहे. मंगळवारी यवतमाळच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३१ हजार ५०० रुपये असा होता. तो बुधवारी दोन हजाराने वाढून ३३ हजार ५०० रुपये असा झाला आहे. परंतु सोन्याच्या या दरवाढीसाठी पाचशे, हजाराच्या नोटा बाद होणे हे कारण नाही, तर अमेरिकेतील राजकीय उलाढाल त्यासाठी कारणीभूत ठरली आहे. अमेरिकन राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत डोनॉल्ड ट्रम्प यांनी आघाडी घेतल्यापासून संपूर्ण जगातील शेअर बाजार पडला. पर्यायाने सोन्याच्या दरात वाढ झाली. त्यामुळे यवतमाळच्या बाजारात सोने एक हजाराने महागले. चलनी नोटा बाद झाल्याने भविष्यात सोन्याची विक्री वाढण्याची शक्यता आहे. लोक नोटांना हात लावणार नाही, त्याची जागा सोन्याचे क्वाईन घेईल, अशी शक्यता सारंग भालेराव यांनी बोलून दाखविली.