बियाणे कंपन्यांचे पीक पाहणी कार्यक्रम हद्दपार
By Admin | Updated: December 29, 2014 02:18 IST2014-12-29T02:18:00+5:302014-12-29T02:18:00+5:30
हंगामात बियाणे विक्रीसाठी शेतकऱ्यांसमोर विविध प्रकारचे मार्केटींग कार्यक्रम घेवून भरघोस पीक उत्पादनाचे दावे करणाऱ्या बीटी बियाणे ..

बियाणे कंपन्यांचे पीक पाहणी कार्यक्रम हद्दपार
राळेगाव : हंगामात बियाणे विक्रीसाठी शेतकऱ्यांसमोर विविध प्रकारचे मार्केटींग कार्यक्रम घेवून भरघोस पीक उत्पादनाचे दावे करणाऱ्या बीटी बियाणे उत्पादक कंपन्या आता दूर-दूरपर्यंत दिसेनाशा झाल्या आहे. अतिरंजित दावे करणाऱ्या या कंपन्यांनी यावर्षी एकाही ठिकाणी पीक पाहणी कार्यक्रम घेतला नाही. त्यामुळे या कंपन्यांचे खोटे दावे यावेळी सताड उघडे पडले आहे.
बीटी कापूस सिंचनाची सुविधा असलेल्या शेतात भरघोस उत्पादन देते. एवढेच नव्हे तर कोरडवाहू शेतजमिनीतही चांगले उत्पादन देते, असा या कंपन्यांचा वेळोवेळी दावा राहिला आहे. कोरडवाहू शेतात यावर्षी क्विंटलने नव्हे तर किलोने उत्पादन झाले आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमावर आपल्या कंपन्यांचे मोठमोठे उत्पादनाचे दावे करणाऱ्या कंपन्या यावर्षी मात्र नावालाही दिसल्या नाही. एखादा पीक पाहणी कार्यक्रम घेऊन आपली शान राखू शकले नाही, हे दिसून आले आहे. अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची बऱ्यापैकी सुविधा आहे. त्यामुळे निदान नावाकरिता वा दाखविण्यासाठी तरी एखादे प्लॉट या कंपन्या कृषी विभागाला आणि शेतकरी ग्राहकांना दाखवतील, अशी अपेक्षा होती. पीक पाहणी कार्यक्रमाच्या माध्यमातून बियाणे कंपन्यांना आपले दावे मांडता येतात. परंतु यावर्षी उत्पन्नाची बाजू लंगडी राहिल्याने कंपन्यांनी पीक पाहणीचा कार्यक्रम घेतलाच नाही. यापूर्वी घेण्यात आलेले कार्यक्रम काही अंशी तरी विश्वास देऊ शकणारे होते. अलीकडे मात्र असा कुठलाही दावा करण्यायोग्य प्लॉट कंपन्यांकडे राहिले नाही, हे त्यांनी घेतलेल्या माघारीवरून स्पष्ट होते. (तालुका प्रतिनिधी)