५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 09:34 PM2018-02-13T21:34:41+5:302018-02-13T21:35:29+5:30

जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

Crop hit 50 thousand hectares | ५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

Next
ठळक मुद्देवादळ-गारपीट : लासीना येथे घर कोसळले, अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू, विजेचे खांब आडवे

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची हानी झाल्याने त्यांच्या डोळ्यात आसवे येऊ लागली आहे.
जिल्ह्यात एक लाख एक हजार ९७३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक ८७ हजार ४५७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. हा हरभरा काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र त्याचवेळी शेतशिवारावर चिकूच्या आकाराच्या प्रचंड गारांचा वर्षाव झाला. यामुळे हरभऱ्याचे घाटे गळून पडले. गारा १२ तास त्या क्षेत्रात विरघळल्या नाही. पहाटेच्या सुमारास त्या गारा शेतात तशाच पडून होत्या.
ओलिताचे साहित्यही गारांमुळे फुटले. शेतशिवारातील जनावरे सैरावैरा धावत सुटली. झाडावर आश्रय घेणारे पक्षीही मरून पडले. काही भागात विजेचे पोल आडवे झाले. तारा तुटल्या, यामुळे वीज प्रवाह खंडित झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. काही ठिकाणी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. दूरध्वनी सेवाही ठप्प झाली.
यवतमाळ तालुक्यातील जामडोहमध्ये वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने झोपड्यांवरचे छत उडून गेले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नेर तालुक्यातील सोनखास परिसरात गारांसह पाऊस झाला. घुईलाही याचा मोठा फटका बसला.
कळंब तालुक्यात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राळेगाव तालुक्यात वाऱ्यासह पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यात सौजना, घारफळ, वाटखेड, कृष्णापूर, केगाव, बोदड, मांजरा येथे जोरदार पाऊस झाला.
आर्णी, दारव्हा तालुक्यात गारांसह पाऊस झाला. उमरखेड तालुक्यातील मुरली, लिंगी, या ठिकाणी गारांसह पाऊस झाला. महागाव तालुक्यातील पिंपळगाव, वडद, देवसरी, लोहारा, कारखेड या ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. घाटंजी, वणी, मारेगाव आणि झरीमध्ये जोरदार पाऊस तर काही प्रमाणात गारपीट झाली. या तालुक्यांमध्ये कोट्यवधीचे पीक शेतशिवारात उभे होते. गारपिटीने तोंडाशी आलेले पीक निसर्ग प्रकोपाने हातातून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मंगळवारी येळाबारा परिसरात १५ मिनीट गारपीट झाली. दहेली, सायखेडा, रामगाव, रामवाकडी, रोहटेक, दुधाना, नवाटी, वाकी, आकपुरी, वागदा आदी गावांना तडाखा बसला. शेती पिकांचे नुकसान झाले.
तृण, गळीत, चारा पिकांचे नुकसान
पावसासह आलेल्या गारांमुळे गहू, ज्वारी, मका या तृणधान्यासह मोहरी, करडई, तिळ, सूर्यफुल या गळीत धान्याचे नुकसान झाले. मका, ज्वारी ही चारा पिके आणि भाजीपाल्यासोबत हरभºयाला सर्वाधिक फटका बसला.
१४४ मिलीमीटर पावसाची नोंद
गत २४ तासांत झालेल्या पावासाने जिल्ह्यात १४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये यवतमाळ १५ मिमी, कळंब १३, राळेगाव २८, बाभूळगाव ३, आर्णी ६, नेर १२, उमरखेड ५, महागाव २, केळापूर १५, घाटंजी ८, वणी ९, मारेगाव ८, झरीमध्ये २० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सरासरी ९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Crop hit 50 thousand hectares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस