लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा (यवतमाळ) : जन्मदात्या मातेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला येथील अतिरिक्त जिल्हा त सत्र न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी व पीडिता वणी तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहेत. १९ जुलै २०२१ रोजी आरोपीची आई मुलीला भेटण्यासाठी वणी येथे गेली होती. त्यामुळे आरोपीने त्याच्या आईला तू मुलीला भेटायला का गेलीस, असे म्हणून तिला मारहाण केली. घटनेच्या दिवशी २३ जुलै २०२१ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास आरोपी दारूच्या नशेत घरी आला. त्यानंतर आईने जेवणाचे ताट आरोपीला त्याच्या खोलीत नेऊन दिले.
जेवण झाल्यानंतर आरोपीने पुन्हा तिला पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर पहाटे तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर आरोपीच्या आईने विष प्राशन केले. त्यामुळे तिची प्रकृती अतिशय गंभीर झाल्याने तिला वणी येथील एका खासगी रुग्णालयात भरती केले.
सहा दिवसांनंतर पीडितेला शुद्ध...
तब्बल ६ दिवसांनंतर पीडिता शुद्धीवर आल्यानंतर तिने वणी पोलिस ठाण्यात ३० जुलै २०२१ रोजी मुलाविरुद्ध अत्याचाराची तक्रार दाखल केली. तक्रारीवरून वणी पोलिस ठाण्यात भादंवि ३७६ (२), (एफ), ३७६ (२) (एन) ३२३, ५०६ अन्वये गुन्हे नोंद करण्यात आले.
तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अरुण नागतोडे यांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील अॅड. रमेश मोरे यांनी याप्रकरणात ८ साक्षीदार तपासले. पांढरकवडा येथील विद्यमान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अभियोग पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार संतोष मडावी यांनी काम पाहिले.