‘सीआरएफ’चा पश्चिम विदर्भाला नाममात्र निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 02:19 PM2020-08-21T14:19:06+5:302020-08-21T14:19:33+5:30

पाच जिल्ह्यांसाठी प्राप्त २२ कोटी १४ लाखाच्या रकमेत अमरावतीला सर्वाधिक दहा कोटी ६९ लाख रूपये मिळाले. यवतमाळ नऊ कोटी ४३ लाख, वाशिम एक कोटी ७५ लाख तर अकोल्याला २६ लाख २९ हजारांचा निधी मिळाला.

CRF's nominal funding to West Vidarbha | ‘सीआरएफ’चा पश्चिम विदर्भाला नाममात्र निधी

‘सीआरएफ’चा पश्चिम विदर्भाला नाममात्र निधी

Next
ठळक मुद्दे१४३० कोटींची कामे, आले केवळ २२ कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत पश्चिम विदर्भात एक हजार ४३० कोटी रुपयांची कामे मंजूर असताना प्रत्यक्षात यावेळी त्यासाठी केवळ २२ कोटी १४ लाख ३९ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी कुणाला द्यावा अन् कुणाला नाही असा पेच बांधकाम अभियंत्यांपुढे निर्माण झाला आहे.
पाच जिल्ह्यांसाठी प्राप्त २२ कोटी १४ लाखाच्या रकमेत अमरावतीला सर्वाधिक दहा कोटी ६९ लाख रूपये मिळाले. यवतमाळ नऊ कोटी ४३ लाख, वाशिम एक कोटी ७५ लाख तर अकोल्याला २६ लाख २९ हजारांचा निधी मिळाला. बुलडाणा जिल्ह्याला तर एक रुपयाही मिळाला नाही.

औरंगाबाद, पुणे विभागाला सर्वाधिक निधी
औरंगाबाद व पुणे विभागाला ‘सीआरएफ’चा सर्वाधिक निधी दिला गेला. त्यातही बांधकाम मंत्री व राज्यमंत्र्यांच्या सर्कलला अधिक वाटा देण्यात आला. नांदेडला ३० कोटी रुपये दिले गेल्याचे सांगितले जाते.

३८ कामे पूर्ण, २० प्रगतीपथावर
अमरावती विभागात सीआरएफची ६३ कामे मंजूर आहेत. त्यापैकी ३८ कामे पूर्ण झाली. २० कामे प्रगतीपथावर आहे. दोन कामे निविदेवर आहेत. तर अमरावतीचे दोन व यवतमाळचे एक अशी तीन कामे अद्याप सुरू झाली नाहीत. या ६३ कामांची एकूण किंमत १४३० कोटी २८ लाख एवढी आहे. मार्च २०२० अखेर या कामांवर ६४० कोटी २९ लाख दहा हजार रुपयांचा खर्च झाला आहे. ७९५ कोटी ६९ लाख ५७ हजारांचा खर्च अद्याप बाकी आहे.

प्राप्त निधीचे कंत्राटदारांना वितरण
गेल्या आठवड्यात मागणी असलेल्या निधी पैकी २२ कोटी १४ लाख ३९ हजार रुपये प्राप्त झाले असून त्यातील २२ कोटी पाच लाख ५३ हजारांचे वितरणही कंत्राटदारांना करण्यात आले. मागणीच्या तुलनेत अगदीच नाममात्र हा निधी प्राप्त झाला आहे.

रस्ते, पुलांसाठी २१ कोटी
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राज्यमार्ग व पुलांच्या कामांपोटी २१ कोटी सहा लाख ७७ हजार रुपये प्राप्त झाले आहे. त्यातील दहा कोटी ६९ लाख अमरावती तर आठ कोटी ५४ लाख यवतमाळला मिळाले.

सीआरएफ व इतर निधी काही प्रमाणात प्राप्त झाला आहे. त्याचे कामाच्या प्रगतीच्या तुलनेत वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
- प्रशांत नवघरे
मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती.

Web Title: CRF's nominal funding to West Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.