डीटीएड विद्यालयांची ‘क्रेझ’ संपली
By Admin | Updated: June 24, 2014 00:06 IST2014-06-24T00:06:13+5:302014-06-24T00:06:13+5:30
वीस वर्षापूर्वी डीएड म्हणजे हमखास नोकरी असे समीकरण झाले होते. मात्र अलिकडे डीटीएड महाविद्यालयांचे पेव फुटले. प्रशिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. त्यामुळे आता डीटीएडकेडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली.

डीटीएड विद्यालयांची ‘क्रेझ’ संपली
रूपेश उत्तरवार - यवतमाळ
वीस वर्षापूर्वी डीएड म्हणजे हमखास नोकरी असे समीकरण झाले होते. मात्र अलिकडे डीटीएड महाविद्यालयांचे पेव फुटले. प्रशिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. त्यामुळे आता डीटीएडकेडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली. परिणामी विद्यार्थीच मिळेणासे झाले. यंदा तर जिल्ह्यातील दोन हजार ४४० जागांसाठी केवळ ४५७ अर्ज आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे.
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शिक्षकी पेशा धुडकावून लावला आहे. परिणामी डीटीएड विद्यालये बंद करण्याची वेळ आली आहे. माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यामुळे डीटीएड विद्यालये पुन्हा हाऊसफूल्ल होतील असा अंदाज व्यवस्थापला होता. प्रत्यक्षात प्रवेशासाठी विद्यार्थी फिरकले नाही. यातून अनेक महाविद्यालयांना बंद करण्याची वेळ येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात ४४ डीटीएड विद्यालये आहेत. या विद्यालयाची क्षमता दोन हजार ४४० विद्यार्थ्यांची आहे. २ जून ते १७ जूनपर्यंत डायटमध्ये प्रवेश प्रक्रिया झाली. यादरम्यान ४५७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज दाखल केले. यामध्ये खुल्या प्रवर्गातील ८० अर्ज आहेत. डीटीएड झालेले अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत. त्यांनाच नोकरी मिळत नाही, मग आपली भर का असा विचार करीत विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवित आहे. पुरेशा विद्यार्थीक्षमते अभावी जिल्ह्यातील अर्धेअधिक विद्यालये बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. चार विद्यालयांनी बंदचा प्रस्ताव डायटकडे पाठविला आहे. यामध्ये झरीचे एक, यवतमाळ दोन, आणि करंजी येथील एक अशा चार विद्यालयाचा यामध्ये समावेश आहे.