दुबईतून आलेले दाम्पत्य वैद्यकीय निरीक्षणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 06:00 IST2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:23+5:30
दर्यापूर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असले तरी कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ तपासणीची कुठलीही व्यवस्था अद्याप उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे रुग्णालय असून, या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने आजारी रुग्ण येत असतात.

दुबईतून आलेले दाम्पत्य वैद्यकीय निरीक्षणात
लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक समारंभ व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान दुबई येथून परतलेले एक दाम्पत्य वैद्यकीय निरीक्षणात आहेत. महसूल प्रशासनाच्या भेटीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दाम्पत्याची तपासणी केली.
दर्यापूर तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय असले तरी कोरोना विषाणू संसर्गाची तात्काळ तपासणीची कुठलीही व्यवस्था अद्याप उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालय तालुक्यातील एकमेव महत्त्वाचे रुग्णालय असून, या ठिकाणी दररोज हजारोंच्या संख्येने आजारी रुग्ण येत असतात. यासंदर्भात कुठलीही उपायोजना नसेल, तर आपत्कालीन घटनेसाठी जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.विषाणू संसर्गासंदर्भात तात्काळ उपाययोजना कराव्या, अशी मागणी दर्यापूरवासीयांनी केली आहे. उपजिल्हा रुग्णालयात सर्दीच्या रुग्णांची भरमार आहे.
दर्यापूर शहरात दोन दिवसांपूर्वी परदेशातून दोन नागरिक दाखल झाले. त्यांची मुंबई येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. दर्यापूर येथे दाखल झाल्यानंतर तहसीलदार, मुख्याधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासनाने संबंधितांच्या घरी जाऊन सर्व तपासणी करून घेतली. त्यांना १५ दिवस बाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात अद्यापही कुठलीही तपासणी यंत्रणा उपलब्ध नाही. अप्रिय प्रसंगी रुग्णाला अमरावती येथे हलविले जाणार आहे.
- डॉ. दिलीप पगारे
वैद्यकीय अधीक्षक