यंदाही कापसाची शेती आतबट्ट्याची
By Admin | Updated: October 21, 2015 02:50 IST2015-10-21T02:50:49+5:302015-10-21T02:50:49+5:30
यंदाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल हवामान आणि अस्थिर बाजार भावामुळे सोयाबीनसह कापसाची शेती

यंदाही कापसाची शेती आतबट्ट्याची
उत्पन्नात घट : शेतकरी हवालदिल, सोयाबीनच्या उतारीतही आली घट
शिंदोला : यंदाच्या खरीप हंगामातील प्रतिकूल हवामान आणि अस्थिर बाजार भावामुळे सोयाबीनसह कापसाची शेती आतबट्ट्याची ठरवण्याचा अंदाज शिंदोला, शिरपूर परिसरातील शेतकरी व्यक्त करीत आहे.
यावर्षीच्या हंगामात सुरूवातीला मृग नक्षत्रात पावसाला समाधानकारक सुरूवात झाली. त्यामुळे २० जूनपूर्वी साधारणत: सर्वच खरीप पिकांच्या पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र अनियमित आणि खंडित पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला. ओलिताची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा करून भारनियमनाला तोंड देत पिकांना जगविले. परंतु उत्तरा नक्षत्रात गणेश चतुर्थीच्या पर्वावर वादळी वाऱ्यासह २४ तासांपेक्षा अधिक काळ पडलेल्या पावसाने कपाशी जमीनदोस्त झाली. परिणामी फळधारणा झालेल्या कपाशीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या या लहरीपणामुळे उत्पादकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरू आहे. परंतु दोन वेच्यातच कपाशीची उलंगवाडी होणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.
एकूणच चित्र लक्षात घेता कोरडवाहू कापसाच्या उत्पादनात निम्म्याने, तर बागायती कपासाच्या उत्पादनात ३० टक्यांनी घट होण्याचा अंदाज शिंदोला येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्यामुळे बागायती कपाशी जगविण्याच्या बाबतीतही पुढे जाऊन अडचणी उभ्या राहू शकतात. त्यातच कापसाच्या अल्प भावामुळे उत्पादन खर्च भरून निघतो किंवा नाही, याबद्दल शेतकरी चिंतीत आहे. सोबतच पणन महासंघासह सीसीआयच्या माध्यमातून कापूस खेरदी सुरू करण्यात येते. मात्र दसरा, दिवाळी जवळ येत असताना संबंधित यंत्रणेकडून कोणत्याच हालचाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना कमी भावात व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. शासकीय कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची मागणी येथील सरपंच संजय निखाडे, परमडोहचे उपसरपंच संदीप थेरे यांनी केली आहे. (वार्ताहर)