Cotton arrivals rise in market committee | बाजार समितीत कापसाची आवक वाढली
बाजार समितीत कापसाची आवक वाढली

ठळक मुद्देखासगीपेक्षा हमीभाव अधिक : व्यापाऱ्यांकडून केवळ पाच हजारांचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : खासगी बाजारपेठेत कापसाला केवळ पाच हजार ते पाच हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने सीसीआयला कापूस विकण्यासाठी वणीच्या बाजार समितीत शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. यंदा कापसाला पाच हजार ५५० रुपये हमीभाव मिळत असल्याने शेतकरी सीसीआयला कापूस विकणे पसंत करीत आहेत.
येथील खासगी बाजार समितीत दिवाळीनंतर लगेच कापसाच्या खरेदीला प्रारंभ झाला. कालपर्यंत या खासगी बाजार समितीत एक लाख दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. वणीच्या शासकीय बाजार समितीत २७ नोव्हेंबरपासून सीसीआयने कापूस खरेदीला सुरूवात केली. नऊ दिवसांत येथे ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक कापसाची खरेदी झाली. दररोज शेकडो वाहने बाजार समितीत कापूस विकण्यासाठी दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वणी बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संतोष कुचनकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
कापसातील आर्द्रतेमुळे शेतकरी हैराण आहेत. १२ टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस खरेदी करू नये, असे सीसीआयचे धोरण असल्याने १२ टक्केपेक्षा अधिक आर्द्रता असलेला कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. यात एका क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
एकीकडे सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली असली तरी नाफेडला मात्र धान्य खरेदीचा मुहूर्त अद्यापही गवसला नाही. परतीच्या पावसामुळे प्रतवारी खालावलेले सोयाबीन शेतकरी मिळेल त्या भावात विकत आहेत. काही गरजवंत शेतकरी चांगले सोयाबीनदेखील कमी भावात व्यापाºयांना विकत असल्याने मोठे नुकसान होत आहे.

Web Title: Cotton arrivals rise in market committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.