१८ ते ४४ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लस मोहीम तात्पुरती थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:16+5:30
संपूर्ण जिल्ह्यात १७८ केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येते. दर दिवसाला २० हजार लसीची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी सरासरी दोन ते तीन हजार लस प्राप्त होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मोठा गोंधळ उडत आहे. यातून स्थानिक पातळीवरील यंत्रणेला रोषाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.

१८ ते ४४ वयोगटातील कोरोना प्रतिबंधक लस मोहीम तात्पुरती थांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात १९ लाख लसीची आवश्यकता असताना आतापर्यंत तीन लाख नागरिकांनाच लसीकरण करण्यात आले आहे. १६ लाख नागरिकांना लस मिळणे सध्या तरी दुरापास्त झाले आहे. यावर उपाय म्हणून आरोग्य मंत्रालयाने दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तूर्त सर्वांनाच पहिल्या डोससाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे. परिणामी १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण तात्पुरते थांबविण्यात आले आहे.
संपूर्ण जिल्ह्यात १७८ केंद्रांवर कमी अधिक प्रमाणात उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात येते. दर दिवसाला २० हजार लसीची आवश्यकता असताना संपूर्ण जिल्ह्यासाठी सरासरी दोन ते तीन हजार लस प्राप्त होत आहे. यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने मोठा गोंधळ उडत आहे. यातून स्थानिक पातळीवरील यंत्रणेला रोषाचा सामना करावा लागत आहे. याशिवाय तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे. यातून परिस्थिती चिघळण्याचेच संकेत आहे. यामुळे आरोग्य मंत्र्यांनी मंगळवारी लसीची गती संथ करण्याचे संकेत दिले होते. सायंकाळी आरोग्य विभागाच्या सूचना जिल्ह्याला मिळाल्या आहेत. या सूचनेमध्ये १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाची गती कमी करण्याच्या सूचना आहेत. त्यासोबतच ४५ वर्ष वयाच्या पुढील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी मोठी प्रतीक्षा यादी आहे. यातील अनेक नागरिकांचा दुसरा डोस संपण्यासाठी काही अवधीच बाकी आहे तर अनेकांना कालावधी संपल्यानंतरही लस मिळत नाही. यामुळे पुढील काळात लस देताना केवळ दुसऱ्या डोसमधील नागरिकांनाच लस देण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना आहेत. यामुळे तूर्त दुसऱ्या डोसची मागणी असणाऱ्या नागरिकांनाच ही लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या डोससाठी काही काळ सर्वांनाच प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जिल्ह्यातील ४९ हजार नागरिकांना दुसऱ्या डोसची नितांत आवश्यकता आहे. यामध्ये अनेकांच्या डोसचा कालावधी संपला आहे. त्यामध्ये ३३ हजार नागरिक कोविशिल्डचे लाभार्थी आहेत तर १६ हजार नागरिक कोव्हॅक्सिनचे लाभार्थी आहेत. कोव्हॅक्सिनसाठी २८ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
२८ दिवसानंतर दुसरा डोस घेण्याच्या सूचना आहे. मात्र कालावधी संपल्यानंतरही डोस मिळत नसल्याने नागरिकांना आता नव्या सूचनेनुसार प्राधान्याने दुसरा डोस मिळणार आहे. त्याच प्रमाणे कोविशिल्डसाठी सहा ते आठ आठवड्याचा कालावधी निर्धारित केला आहे. या कालावधीत लसीचा दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्या दृष्टीने या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे.
ऑनलाईन नोंदणीला तूर्त ब्रेक
- दहा केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी तयारी करण्यात आली होती. या वयोगटांसाठी लस उपलब्ध न झाल्याने काही काळासाठी या वयोगटातील नोंदणी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना काही काळ ऑनलाईन नोंदणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
१७ हजार डोस मिळणार
- यवतमाळ जिल्ह्यासाठी लागणारी लस संपल्याने १७ हजार डोसचा पुरवठा करण्यात आला आहे. गुरुवारपर्यंत ही लस जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यानंतर विविध केंद्रांवर दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना ही लस मिळणार आहे.