कोरोनाच्या 3 लाख लसी हव्या, मिळाल्या 34 हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 05:00 IST2021-03-14T05:00:00+5:302021-03-14T05:00:12+5:30
लसीकरणाच्या टप्प्यात ६० वर्षाच्या पुढील नागरिक तर ४५ ते ५९ वयोगटातील दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीला लस दिली जात आहे. या टप्प्यात जिल्ह्याला किमान ८ लाख नागरिकांना लसीकरण करावयाचे आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात २२ शासकीय लसीकरण केंद्र आहेत. तर १८ खासगी लसीकरण केंद्र मंजूर असून त्यापैकी १४ केंद्रावर कोविडची लस दिली जात आहे.

कोरोनाच्या 3 लाख लसी हव्या, मिळाल्या 34 हजार
सुरेंद्र राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या परिस्थितीला हाताळण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने ३ लाख लसींची मागणी केली. त्यापैकी ३४ हजार लस शनिवारी प्राप्त झाल्या. यामुळे शनिवारी खासगी केंद्रावरील बंद असलेले लसीकरण पूर्ववत सुरू झाले.
प्राथमिक आरोग्य केंद्रावरून ग्रामीण भागात लस देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.
लसीकरणाच्या टप्प्यात ६० वर्षाच्या पुढील नागरिक तर ४५ ते ५९ वयोगटातील दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तीला लस दिली जात आहे. या टप्प्यात जिल्ह्याला किमान ८ लाख नागरिकांना लसीकरण करावयाचे आहे. त्यासाठी नियोजन केले जात आहे. सध्या जिल्ह्यात २२ शासकीय लसीकरण केंद्र आहेत. तर १८ खासगी लसीकरण केंद्र मंजूर असून त्यापैकी १४ केंद्रावर कोविडची लस दिली जात आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरांमध्ये लसीकरणाची गती बऱ्यापैकी आहे. नागरिकांचा पैसे देऊन लस घेण्याकडे कल वाढला आहे. शासकीय केंद्रापेक्षाही खासगी केंद्रावर लसीकरणासाठी गर्दी होत आहे. मात्र या आठवड्यात मागील तीन दिवस खासगी केंद्रांना लसच उपलब्ध झाली नाही. १,५०० लसींचा बफर स्टॉक लस भांडारगृहात ठेवण्यात आला होता. बफर स्टॉकमधून खासगी केंद्राला लस देण्यास मनाई आहे. सुरुवातीला जिल्ह्यात ६१ हजार लस प्राप्त झाली होती. त्यापैकी ३७ हजार २८२ व्हायलचा वापर केला गेला. नंतर शनिवारी ३४ हजार व्हायल लस मिळाली आहे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर पुरेशी सुविधा आहे अशा ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रांची कोविड लसीकरणासाठी निवड करण्यात आली आहे.
या केंद्रांवर सोमवारपासून लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांनाही कोविडची लस दिली जावी, यासाठी आरोग्य विभागाकडून नियोजन केले जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोफत लस देण्यात येणार आहे. त्याचा आढावाही घेण्यात आला आहे.
३४ हजार लस उपलब्ध झाल्याने खासगी केंद्रांनाही त्याचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे कालपर्यंत ठप्प असलेले खासगी केंद्रातील लसीकरण शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे.
एका ‘व्हायल’मधील दोन डोस जातात वाया
कोरोना लसीच्या एका ‘व्हायल’मध्ये (छोटी बॉटल) दहा डोस असतात. एक व्हायल फोडल्यानंतर तिला चार तासाच्या आत संपविणे आवश्यक आहे. या चार तासात जितके डोस दिले जाईल तेवढे चांगले आहे. एका व्हायलमध्ये दहा डोस दिले जातात. ही व्हायल संपविण्यासाठी चार तासात लसीकरणाकरिता १० व्यक्ती उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र बऱ्याचदा हे प्रमाण पाळता येत नाही. त्यामुळे एका व्हायलमधील दोन डोस सरासरी वाया जातात. आतापर्यंत सात हजार डोस या कारणाने वाया गेल्याची माहिती आहे. हे नुकसान टाळण्यासाठी अगोदरच नोंदणी व वेळेवर लसीकरणासाठी उपस्थिती ठेवणे अपेक्षित आहे.