राजूर येथील चुना उद्योगावर संक्रांत
By Admin | Updated: October 27, 2014 22:45 IST2014-10-27T22:45:41+5:302014-10-27T22:45:41+5:30
तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून परिचित राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर संक्रांत ओढवली आहे. पर्यावरण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे या उद्योगाला आता अखेरची घरघर लागली आहे़

राजूर येथील चुना उद्योगावर संक्रांत
वणी : तालुक्यातील ‘मिनी इंडिया’ म्हणून परिचित राजूर (कॉलरी) येथील ब्रिटिशकालीन चुना उद्योगावर संक्रांत ओढवली आहे. पर्यावरण विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे या उद्योगाला आता अखेरची घरघर लागली आहे़ त्यामुळे लघु उद्योजक आणि चुना भट्टी व गिट्टी खाणीत काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे.
‘मिनी इंडिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजूर (कॉलरी) येथे ब्रिटिश काळापासून चुना उद्योग सुरू आहे. तेथे कोळशाची भूमिगत खाणही आहे़ या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून राजूर येथे आले आहेत. त्यापैकी बहुतांश कामगार आता तेथेच कायमस्वरूपी राहात आहेत. वणी तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राजूर हे गाव आहे़ या गावात सर्व धर्मीय तसेच सर्वच भाषा अवगत असलेले लोक वास्तव्यास आहे़
या गावात देशाच्या अनेक प्रांतातील नागरिक आता वास्तव्य करीत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाम आदी राज्यातील नागरिक तेथे स्थायिक झाले आहेत. याच गावात ब्रिटिश काळापासून भूमिगत कोळसा खाण होती़ त्यामुळे परप्रांतील कामगार तेथे मोठ्या संख्येने आले आहेत. तेथील कोळशालाही भारतात मोठ्या प्रमाणात मागणी होती़ सध्या या खाणीतील कोळशाचे उत्पादन ठप्प पडले आहे.
राजूर येथे ब्रिटिश काळापासून चुना तयार करणाऱ्या जवळपास ४० भट्ट्या आहे. तसेच चुना तयार करण्यासाठी लागणाऱ्या डोलोमाईट व लाईम स्टोन, या कच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या जवळपास १५ खाणी आहेत़ त्यापैकी तूर्तास चुना तयार करणारे सात ते आठ चुना भट्टे व दोन ते तीन गिट्टीच्या खाणीच तेवढ्या सुरू आहे. चुना उद्योग चालविण्यासाठी लागणारा कच्चा माल डोलोमाईट, लाईम स्टोन, या खाणींना पर्यावरण विभागाने मोठ्या उद्योगांच्या अटी व शर्ती लागू केल्या आहे़ या अटी, शर्तीची पूर्तता करणे शक्य नसल्याने लघु उद्योजक डबघाईस आले आहेत. पर्यावरण विभागाच्या अटी व शर्तींमुळे चुना उद्योगाला कच्चा माल पुरविणाऱ्या जवळपास १0 ते १२ खाणी आता बंद पडल्या आहेत. या खाणींमध्ये कार्यरत कामगार आता बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. तसेच शासनाच्या गौण खनिज कराचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नुकसानही होत आहे़ कच्चा माल उपलब्ध नसल्याने चुना तयार करणाऱ्या लघु उद्योजकांवर चुना भट्टे बंद करण्याची वेळ ओढवली आहे़ त्यामुळे डोलोमाईट व चुना भट्ट्यांवर काम करणारे मजूरही रोजगारापासून वंचित होत आहे. पूर्वी सणासुदीला मोठ्या प्रमाणात चुन्याची मागणी होती. मात्र आता बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रक्रिया करून तयार केलेल्या अत्याधुनिक रंगामुळे दिवसेंदिवस चुन्याची मागणी कमी होत चालली आहे़ परिणामी चुन्याचे उत्पादनही कमी होत आहे. कच्च्या मालाच्या खाणीच नसल्याने कच्चा मालही महागला आहे़ दर्जेदार कोळसाही मिळत नाही़ कोळशावर शासनाने दिलेले अनुदान काढून टाकले आहे. पूर्वी राजूर येथील चुन्याला संपूर्ण भारतात मोठी मागणी होती. मात्र आता हा चुना केवळ विदर्भातच पोहोचला जात आहे़ तीन वर्षांपूर्वी पर्यावरण विभागाने डोलोमाईट व लाईम स्टोन खाणी सुरू करण्यासंदर्भात लोकसुनावण्या घेतल्या. त्या लोकसुनावण्याही निरर्थक ठरल्याने, या उद्योगाला आता अखेरची घरघर लागली आहे. त्यामुळे या उद्योगात काम करणारे शेकडो मजूर बेरोजगार झाले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)