विधानसभा उमेदवारीपासूनच तोडसाम वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 22:14 IST2017-09-09T22:13:59+5:302017-09-09T22:14:11+5:30

आॅडीओ क्लिपमुळे राज्यातील भाजपा सरकार व पक्षाच्या बदनामीचे धनी ठरलेले आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल ...

Controversial content from the Assembly's candidature | विधानसभा उमेदवारीपासूनच तोडसाम वादग्रस्त

विधानसभा उमेदवारीपासूनच तोडसाम वादग्रस्त

ठळक मुद्देआर्णी-केळापूर मतदारसंघ : केंद्रीय नेत्याचा आशीर्वाद वाचविणार काय?

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आॅडीओ क्लिपमुळे राज्यातील भाजपा सरकार व पक्षाच्या बदनामीचे धनी ठरलेले आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम हे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्यापासूनच वादग्रस्त ठरले आहे. निवडून आल्यानंतर त्यांच्या वादग्रस्ततेची अनेक प्रकरणे पुढे आली.
आर्णी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उद्धव येरमे यांना उमेदवारी दिली होती. एबी फॉर्मवर पहिल्या क्रमांकावर येरमे यांचे नाव होते. तेव्हा किमान दुसºया क्रमांकावर तरी आपले नाव लिहावे म्हणून तोडसाम व समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला होता. पक्षाचे झेंडे फेकणे, पक्षविरोधी घोषणा देणे असे प्रकार घडले होते. तेव्हाच तोडसाम यांचे पक्षातील खरे रूप उघड झाले होेते. छाननीच्या दिवशी उद्धव येरमे एकटेच पांढरकवडाला गेले असता त्यांना तोडसाम समर्थकांनी घेरून अप्रत्यक्ष माघार घेण्यासाठी दबाव निर्माण केला. केंद्रात वावरणाºया एका नेत्याने आर्णी रोडवरील हॉटेलमध्ये हात जोडून मध्यस्थी केल्यानंतर येरमे यांनी माघार घेतली आणि तोडसाम यांच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला. अनपेक्षितरित्या तोडसाम विजयी झाले. भाजप-काँग्रेसच्या समन्वयाची खेळी उलटल्याने तोडसाम यांचा विजयी झाल्याची चर्चा आजही जिल्ह्याच्या राजकारणात आहे.
आमदार म्हणून निवडून आल्यानंतर राजू तोडसाम यांच्या अनेक आढावा बैठका गाजल्या. त्यांच्या बोलण्या, वागण्याच्या शैलीवर अधिकारी-कर्मचारी नाराज आहेत. अनेकांना त्यांच्या या वागण्याचा अनुभव आला. शिस्तीतील पक्ष भाजपा व आमदारकीला साजेशी त्यांची वागणूक नसल्याचे आता भाजपातूनच उघडपणे बोलले जात आहे. बांधकाम कंत्राटदार शिवदत्त शर्मा यांच्याशी झालेल्या मोबाईल संभाषणाची आॅडीओ क्लिप व्हायरल झाली आणि तोडसाम यांचा कारणामा राज्यभर चर्चेचा विषय ठरला. त्यांनी पैशाची मागणी केल्याचा कंत्राटदार शर्मा यांचा आरोप आहे.
आगामी हिवाळी अधिवेशनातही ही क्लिप गाजण्याची शक्यता आहे. ते पाहता पक्ष व सरकारला आमदार राजू तोडसाम यांच्याबाबत आताच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण तोडसाम यांच्या आमदारकीच्या राजीनाम्याची विरोधी पक्ष आणि जनतेतून जोरदार मागणी होत आहे. त्याला भाजपातील दुसºया गटाकडूनही छुपे समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे. आमदार तोडसाम यांना केंद्रीय भाजपा नेत्याचे आशीर्वाद असल्याचे मानले जाते. कारवाईपासून वाचण्यासाठी आशीर्वादाचा हा आडोसा तोडसाम यांना कितपत फलदायी ठरतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

आॅडिओ क्लिपचे हे प्रकरण कुणाच्याही दबावाला बळी न पडता वरपर्यंत रेटण्याचा चंग कंत्राटदारांनी बांधला आहे.
काही महिन्यांपूर्वी तोडसाम यांनी पक्षाच्याच मीडिया प्रमुखाला आर्णीत मारहाण केल्याचे प्रकरण पुढे आले होते. काम देण्यासाठी पैसे मागितले, अशी या मीडिया प्रमुखाची ओरड होती.
अशी आणखीही प्रकरणे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. केवळ भीती व दबावामुळे या प्रकरणांची चर्चा झाली नसावी, असा अंदाज आहे.
तोडसाम यांच्या आॅडिओ क्लिपने ‘न खाऊंगा, न खाने दुंगा’ असा नारा देणाºया भाजपाच्या कथीत भ्रष्टाचारमुक्ती व कर्तव्यदक्षतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.

Web Title: Controversial content from the Assembly's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.