नियंत्रण कक्षात तब्बल पाऊणशे पोलिसांची फौज
By Admin | Updated: December 30, 2014 23:44 IST2014-12-30T23:44:48+5:302014-12-30T23:44:48+5:30
पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या तपासाला, मोर्चे-आंदोलनाच्या बंदोबस्ताला आणि रात्रगस्तीला अधिकारी-कर्मचारी नाहीत. तर दुसरीकडे नियंत्रण कक्षात तब्बल डझनभर अधिकारी आणि पाच डझन

नियंत्रण कक्षात तब्बल पाऊणशे पोलिसांची फौज
११ अधिकारी-६० कर्मचारी : पोलीस ठाण्यांमध्ये मात्र वाणवा
यवतमाळ : पोलीस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांच्या तपासाला, मोर्चे-आंदोलनाच्या बंदोबस्ताला आणि रात्रगस्तीला अधिकारी-कर्मचारी नाहीत. तर दुसरीकडे नियंत्रण कक्षात तब्बल डझनभर अधिकारी आणि पाच डझन कर्मचाऱ्यांची भाऊगर्दी झाली आहे. पोलीस दलाच्या या विसंगत स्थितीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात सध्या तीन पोलीस निरीक्षक, चार सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक आणि तब्बल ६० कर्मचारी तैनात आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नियंत्रण कक्षात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांची गर्दी करण्यामागील रहस्य गुलदस्त्यात आहे. वास्तविक नियंत्रण कक्षात चार ते पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु प्रत्यक्षात तेथे पाऊणशे कर्मचारी तैनात केले गेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी असल्याने त्यांना बसायला खुर्च्या आणि हाताला कामही नाही. नियंत्रण कक्षात तैनाती असलेले हे कर्मचारी बसण्यासाठी इतरत्र जागा शोधताना दिसतात. कुठेच जागा मिळाली नाही तर तासन्तास टपरीवर घालवतात. नियंत्रण कक्षातील ड्युटीला हे अधिकारी-कर्मचारी त्रासले आहेत. आम्हाला काही तरी काम द्या हो, असा टाहो ते फोडत आहेत. कोणत्याही कामाशिवाय दरमहा पगार घेणे यातील अनेकांना रुचणारे नाही.
जिल्ह्यात २९ पोलीस ठाणे, पाच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, कर्मचारी कल्याण शाखा, महिला कक्ष आदी विभाग आहेत. मात्र तेथे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची ओरड नेहमीच ऐकायला मिळते. अनेक पोलीस ठाण्यांमध्येसुद्धा पुरेसे मनुष्यबळ नसल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. रखडलेले तपास, डिटेक्शनचे घटलेले प्रमाण, गस्त न घालणे, वाढती गुन्हेगारी यासाठी पुरेशा मनुष्यबळाचा अभाव हे प्रमुख कारणे सांगितले जाते. तर दुसरीकडे मनुष्यबळाबाबत असमतोल निर्माण झाल्याचे चित्र आहे. पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. तर नियंत्रण कक्षात कोणत्याही कामाशिवाय ११ पोलीस अधिकारी आणि ६० कर्मचारी अडवून ठेवण्यात आले आहे. गृह पोलीस उपअधीक्षकाच्या या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)