१० कोटींच्या कामावर कंत्राटदारांच्या उड्या
By Admin | Updated: January 4, 2015 23:20 IST2015-01-04T23:20:10+5:302015-01-04T23:20:10+5:30
रोजगार हमी योजनेच्या कामांकडे पाठ फिरवित गेल्या वर्षभरापासून कंत्राटदारांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतील कामे मिळविण्याचा सपाटा चालविला आहे.

१० कोटींच्या कामावर कंत्राटदारांच्या उड्या
यवतमाळ : रोजगार हमी योजनेच्या कामांकडे पाठ फिरवित गेल्या वर्षभरापासून कंत्राटदारांनी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतील कामे मिळविण्याचा सपाटा चालविला आहे. सद्यस्थितीत मृद व जलसंधारणाच्या कामांसाठी सुमारे १० कोटी रूपये निधी शिल्लक आहे. हा निधी खेचून नेण्यासाठी वनाधिकारी आणि कंत्राटदारांचे प्रयत्न आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांकडे फिल्डींग लावल्याचीही माहिती आहे.
वन विभागामार्फत झरी आणि पांढरकवडा तालुक्यात रोहयोची कामे करण्यात आली. मजुरांची बोगस उपस्थिती दर्शवून झालेला कोट्यवधींचा गैरप्रकार राज्यभर गाजला. वनाधिकाऱ्यांवर गंभीर गुन्हेही दाखल झाले. याचा धसका घेत वनाधिकारी आणि त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांनी आपला मोर्चा जिल्हा नियोजन विकास निधीतून वनविभागामार्फत केला जाणाऱ्या मृदा व जलसंधारणाच्या कामांकडे वळविला. ही कामे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी करावयाची आहे. त्यातही मशीनने करण्याची मूभा आहे. त्यामुळे बहुतांश कामे ही कागदोपत्री होऊ शकतात. या हेतूने या कामांसाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. सध्या यवतमाळ वनवृत्तासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीने मंजूर केलेला १० कोटींचा निधी शिल्लक आहे. आपल्या पदरात जास्त निधी पडावा, यासाठी प्रयत्न आहे. पालकमंत्र्यांकडे वनाधिकारी आणि कंत्राटदारांनी फिल्डींग लावल्याचे सांगण्यात येते. (स्थानिक प्रतिनिधी)