साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा वांद्यात

By Admin | Updated: September 5, 2015 02:51 IST2015-09-05T02:51:31+5:302015-09-05T02:51:31+5:30

राज्य मार्गाच्या साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा मॅनेज करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता या निविदांचा वाद थेट मुख्य अभियंत्यांच्या दरबारात पोहोचला आहे.

Construction of Rs | साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा वांद्यात

साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा वांद्यात

मुख्य अभियंत्यांकडे तक्रार : दोन कंत्राटदारांचा पुढाकार, हॉटमिक्स प्लान्टच्या अस्तित्वालाच आव्हान
पुसद : राज्य मार्गाच्या साडेसहा कोटींच्या बांधकाम निविदा मॅनेज करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर आता या निविदांचा वाद थेट मुख्य अभियंत्यांच्या दरबारात पोहोचला आहे. पुसदमधील दोन कंत्राटदारांनी अन्य कंत्राटदारांच्या हॉटमिक्स प्लान्टवर प्रश्नचिन्ह लावल्याने या निविदा वांद्यात सापडल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पुसद विभागाला राज्य मार्गांच्या नूतनीकरणासाठी विविध मार्गाने यावर्षी मार्चनंतर साडेसहा कोटी रुपये मिळाले आहेत. त्याच्या निविदा काढल्या गेल्या. मात्र या निविदा मॅनेज व्हाव्या, अशी ‘राजकीय इच्छाशक्ती’ होती. या इच्छाशक्तीमागे पाच टक्क्यांचे तब्बल ३० लाखांच्या ‘मार्जिन’चे गणित जुळले होते. म्हणून या निविदा मॅनेज करण्याचे फर्मान सोडले गेले. किनवटपासूनचे कंत्राटदार या निविदांसाठी आले होते. मात्र प्रत्यक्ष अत्याधुनिक हॉटमिक्स प्लॅन्ट असलेल्या दोन कंत्राटदारांनी निविदा मॅनेजला नकार दिला. आमच्याकडे प्लॅन्ट असल्याने निविदा मॅनेजचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. मॅनेज करायचे असेल तर आम्हाला प्रत्येकी चार कोटींची कामे द्या, अशी अट घातली. त्यानंतरही यवतमाळातील एका कंत्राटदाराने पुसदमध्ये जाऊन बाहेरच्या बाहेर पैशाच्या बळावर निविदा मॅनेजची तयारी केली होती. मात्र त्यालाही प्रतिसाद दिला नाही. ज्यांच्याकडे प्रत्यक्ष प्लॅन्टच नाही किंवा ज्यांचे प्लॅन्ट कालबाह्य झाले आहेत त्यांना निविदा भरण्याचा अधिकारच नसल्याची भूमिका त्या दोन कंत्राटदारांनी घेतली. अखेर सर्वांनीच या कामांसाठी निविदा दाखल केल्या. म्हणून त्या दोन कंत्राटदारांनी आता थेट सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता सी.व्ही. तुंगे यांच्या दरबारात धाव घेतली. त्यांच्याकडे रितसर तक्रार नुकतीच दाखल केली. या कंत्राटदारांनी पुसदमधील साडेसहा कोटींच्या निविदा भरल्या त्या सर्वांचे प्लान्ट तपासावे, त्यांचे वीज बिल-वापर पहावा, ते मॅन्युअली चालतात की संगणकाद्वारे हे तपासावे, हे प्लान्ट खरोखरच अत्याधुनिक आहेत काय याची शहानिशा करावी, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. या तक्रारीमागेही ‘राजकीय इच्छाशक्ती’च असल्याचे बांधकाम खात्यात बोलले जाते.
दोन कंत्राटदारांनी केलेल्या तक्रारी वास्तव आहे. पुसद विभागातील अनेक प्लॅन्ट केवळ कागदावरच सुरू आहेत. तेथे व्हायब्रेटर रोलर नाही, सेन्सर पेवर, डांबराचे स्प्रिंकलर, संगणक सिस्टीमद्वारे आॅपरेटींग नाही. त्यानंतरही या कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची कामे दिली जात आहे. दोन कंत्राटदारांच्या तक्रारीमुळे साडेसहा कोटी रुपयांच्या निविदा वांद्यात सापडल्या आहेत.
पुसद कार्यकारी अभियंत्याला पाचारण
दोन कंत्राटदारांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुसदचे कार्यकारी अभियंता खुशाल पाडेवार यांना गुरुवारी यवतमाळच्या अधीक्षक अभियंत्यांनी पाचारण केले होते. त्यांच्याकडून माहिती घेऊन मध्यम मार्ग काढण्याचे व गुंता सोडविण्याचे त्यांना सूचित करण्यात आले. मुख्य अभियंता सी.व्ही. तुंगे यांच्या स्तरावरूनही या तक्रारीत नेमके किती तथ्य आहे, ही बाब तपासली जात आहे.
‘लोकमत’ने वेधले होते लक्ष
पुसदमधील हॉटमिक्स प्लान्टच्या गुणवत्तेबाबत ‘लोकमत’ने वृत्ताद्वारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे यापूर्वीच लक्ष वेधले होते. प्लॅन्ट खरेदीची खोटी देयके आणणे, अंदाजपत्रक दाखविणे, मशीनरी केवळ उभी असणे असे प्रकार आजही पुसद विभागातील प्लॅन्टवर सुरू आहेत. मात्र त्याकडे डोळेझाक करुन तत्कालीन कार्यकारी अभियंता पोपटराव पंडागळे यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल २० कोटींची कामे दिली होती. त्यात पूरहानीच्या निधीचाही समावेश आहे. प्रत्यक्ष प्लॅन्ट नसताना हॉटमिक्सची कामे देण्यामागे ‘टक्केवारी’चे गणित होते. हे अभियंता आता सेवानिवृत्त झाले आहेत.
अधीक्षक अभियंता पुसदमध्ये
सार्वजनिक बांधकाम विभागाचे यवतमाळ येथील अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के शुक्रवारी येथे दाखल झाले. त्यांनी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी व तपासणी केल्याचे सांगण्यात येते.
हॉटमिक्स प्लॅन्टचा सौदा केवळ १२ लाखांत
नव्याने हॉटमिक्स प्लान्ट उभारायचा असेल तर मोठा निधी खर्च करावा लागतो. मात्र एखादा जुना प्लॅन्ट केवळ १२ लाखात विकला जात असेल तर त्याची खरोखरच गुणवत्ता काय असेल हे लक्षात येते. पुसदमध्ये अशाच एका प्लान्टचा सहा मित्रांपैकी दोघांनी अवघ्या १२ लाखांत सौदा केला. या कालबाह्य प्लान्टची कागदोपत्री उपयोगिता दाखवून सार्वजनिक बांधकाम खात्यातून गेल्या काही वर्षात कोट्यवधी रुपयांची कामे मिळविली गेली, हे विशेष. लाभाचे साक्षीदार बनल्याने अभियंत्यांनीही या प्लान्टच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची तसदी कधी घेतली नाही. अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के यांनी संपूर्ण जिल्ह्यातीलच हॉटमिक्स प्लान्टची तपासणी केल्यास मोठे घबाड उघड होण्याची शक्यता आहे.

Web Title: Construction of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.