बांधकाम कंत्राटदाराच्या मृत्यूने दीड तास चक्काजाम
By Admin | Updated: August 26, 2014 23:44 IST2014-08-26T23:44:37+5:302014-08-26T23:44:37+5:30
एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर त्याच्यासोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे मंगळवारी सकाळी घडली.

बांधकाम कंत्राटदाराच्या मृत्यूने दीड तास चक्काजाम
बोरी अरब : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर त्याच्यासोबत असलेला तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे मंगळवारी सकाळी घडली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह रस्त्यावर ठेऊन तब्बल दीड तास चक्काजाम केला. यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
शेख कलीम शेख फरीद (४२) रा. बोरी अरब असे मृताचे नाव आहे. तर त्याचा नातेवाईक शेख तौकीर शेख तन्वीर (३) हा गंभीर जखमी झाला. बांधकाम कंत्राटदार असलेला शेख कलीम दुचाकी (क्र. एमएच २९ झेड ६१५२) ने दारव्हा येथे जात होता. बोरी अरब येथील अडाण नदीवरील पूल पार केल्यानंतर टागोर विद्या मंदिरा समोर समोरून येणाऱ्या एसटी बसने (एमएच ४०-८१३८) सकाळी ८.३० वाजता जबर धडक दिली. यात शेख कलीमच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला शेख तौकीर हा गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ व नंतर नागपूरच्या रूग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान एसटीचालक बससह तेथून पसार झाला.
अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. दारव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्यानंतर दारव्हा येथे उत्तरीय तपासणी होऊन मृतदेह बोरीअरब येथे आणला. मात्र यावेळी संतप्त नागरिकांनी एसटी चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी करीत मृतदेह बसस्थानकासमोर ठेवला. चक्काजाम करून वाहतूक रोखून धरली. यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. शेवटी दारव्हा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी टावरे यांनी संतप्त नागरिकांची समजूत घातली. चालकाच्या अटकेचे आश्वासन दिले. त्यामुळे मृतदेह उचलण्यात आला, आणि वाहतूक सुरळीत झाली. शेख कलीमच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)