काँग्रेसच्या कर्जमुक्ती पदयात्रेने लक्ष वेधले

By Admin | Updated: June 28, 2015 00:05 IST2015-06-28T00:05:06+5:302015-06-28T00:05:06+5:30

कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अकोलाबाजार येथे आयोजित शेतकरी कर्जमुक्ती पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.

Congress raised the attention of the debt relief march | काँग्रेसच्या कर्जमुक्ती पदयात्रेने लक्ष वेधले

काँग्रेसच्या कर्जमुक्ती पदयात्रेने लक्ष वेधले

नेत्यांची मांदियाळी : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुली दत्तक
अकोलाबाजार : कर्जाच्या खाईत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी अकोलाबाजार येथे आयोजित शेतकरी कर्जमुक्ती पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधले. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्यांच्या दोन मुलींना दत्तक घेतले. राज्यस्तरीय आंदोलनाचे रणशिंग अकोलाबाजार येथून फुंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले.
यवतमाळ तालुक्यातील पिंपरी बुटी येथून शनिवारी काँग्रेसने शेतकरी कर्जमुक्ती या राज्यस्तरीय आंदोलनाचा शुभारंभ केला. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, विधानसभा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी केले. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. या आंदोलनात विदर्भातील काँग्रेसचे बहुतांश आजी-माजी आमदार सहभागी झाले होते. पिंपरी येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांचे सांत्वन करून मदत देण्यात आली. त्यातील रुपेश रामचंद्र काळे या शेतकऱ्याच्या दोन मुलींना आमदार यशोमती ठाकूर व संध्याताई सव्वालाखे यांनी दत्तक घेत शिक्षणासह संगोपनाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर पाच किलोमीटर शेतकरी कर्जमुक्ती पदयात्रा काढून अकोलाबाजार येथे त्याचे जाहीर सभेत त्याचे रुपांतरण झाले. यावेळी काँग्रेस नेत्यांनी भाजपा-सेना युती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. अशोक चव्हाण म्हणाले, युती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूकच केली असून शेतमालाचे भाव घसरले आहे. शेतकऱ्यांना कोणतीच मदत झाली नाही. संपूर्ण कर्जमाफीसाठी भाग पाडणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. अन्य नेत्यांनीही विचार मांडले. आमदार यशोमती ठाकूर यांनी भाजपाविरोधी नारे दिले. (वार्ताहर)

माजी प्रदेशाध्यक्षांसह आमदारांचे मोबाईल लंपास
काँग्रेसच्या कर्जमुक्ती आंदोलनाला चोरट्यांचा फटका बसला. माजी प्रदेशाध्यक्षासह चार आमदारांचे महागडे मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. तर अकोलाबाजार येथे पदयात्रेच्या चहा-पानाची व्यवस्था करणाऱ्या कार्यकर्त्याचे रोख दहा हजारही चोरट्यांनी लांबविले. या हातसफाईची चर्चा आंदोलनादरम्यान रंगली होती.
नेहमी आलिशान वाहनातून फिरणाऱ्या नेत्यांची पदयात्रेत चांगलीच दमछाक झाल्याचे दिसत होते. याच संधीचा फायदा घेऊन नेहमी रस्त्यावर असणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याच नेत्यांच्या आलिशान वाहनातून पिंपरी बुटी ते अकोलाबाजारपर्यंत सफर करून काही क्षणाचा का होईना आनंद लुटला.

Web Title: Congress raised the attention of the debt relief march

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.