काँग्रेसला नवनेतृत्वाची अ‍ॅलर्जी

By Admin | Updated: June 25, 2014 00:41 IST2014-06-25T00:41:36+5:302014-06-25T00:41:36+5:30

वणी विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसला नवीन नेतृत्वाची ‘अ‍ॅलर्जी’ दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात या पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवीन नेतृत्वच तयार होऊ दिले नाही.

Congress newborn allergy | काँग्रेसला नवनेतृत्वाची अ‍ॅलर्जी

काँग्रेसला नवनेतृत्वाची अ‍ॅलर्जी

पक्षांतर्गत विरोधक संपविले : आमदारांनी साधली धूर्त खेळी, दावेदारी कायम
रवींद्र चांदेकर - वणी
वणी विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेसला नवीन नेतृत्वाची ‘अ‍ॅलर्जी’ दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षात या पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवीन नेतृत्वच तयार होऊ दिले नाही. त्यातच आमदार वामनराव कासावार यांनी धूर्त खेळी करीत पक्षातील अंतर्गत विरोधकही निष्प्रभ करून सोडले. त्यामुळे तूर्तास तरी कासावार यांच्याशिवाय आमदारकीच्या उमेदवारीचा कुणीच ‘दावेदार’ नाही.
वणी विधानसभा मतदार संघ आत्तापर्यंत कॉंग्रेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. नामदेवराव काळे, विश्वास नांदेकर असे अपवाद वगळात या मतदार संघातून सातत्याने कॉंग्रेसचेच उमेदवार विजयी झाले. खुद्द वामनराव कासावार या मतदार संघातून चारदा विजयी झाले आहे. त्यामुळे हा मतदार संघ कॉंग्रेस धार्जीणा असल्याचे सांगितले जाते. मात्र आता काळ बदलला आहे. युवा पिढी निर्णायक झाली आहे. युवा शक्ती चांगलीच एकवटली आहे. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला आहे. या मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांना दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले आहे. त्यातूनच आता कॉंग्रेसची पकड ‘सैल’ होत असल्याचे दिसून येत आहे.
कॉंग्रेसमध्ये यापूर्वी दोन गट होते. मात्र तरीही निवडणुकीत कॉंग्रेसचाच उमेदवार विजयी होत होता. मागील निवडणुकीतही कासावार यांनी बाजी मारली होती. त्यावेळी अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांमुळे त्यांची भट्टी जमली होती. मात्र यावेळी लोकसभेतील मोदी लाट कायम राहिल्यास त्यांचे देऊळ पाण्याखाली जाण्याचीच शक्यता आहे. कॉंग्रेसकडे नाही म्हणायला येथील नगरपरिषदेत दोन सदस्य आहे. मारेगाव व झरीजामणी तालुक्यात प्रत्येकी एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समिती सदस्य आहे. वणी पंचायत समितीतही एक सदस्य आहे. अर्थात ग्रामीण भागात अद्यापही कॉंग्रेस काही प्रमाणात शाबूत असल्याचे दिसून येत आहे. तथापि जनतेची कामे होत नसल्याने प्रचंड नाराजी आहे.
कॉंग्रेसमध्ये सध्या तरी दोन गट नाही, हीच कासावार यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आमदार वामनराव कासावार यांनी त्यांचे प्रबळ विरोधक असलेले येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.विनायक एकरे यांच्या गटाचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले. एवढेच नव्हे तर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपताच, त्या ठिकाणी आपल्या खंद्या समर्थकांना प्रशासक म्हणून बसविले. मारेगाव तालुक्यातील नेते जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र ठाकरे यांच्याशी आमदारांनी बरोबर जुळवून घेतले. गेल्या पाच वर्षात पक्षात मातब्बर नेतृत्वही तयार केले नाही. वणी विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष असलेले त्यांचे धाकटे पुत्र अ‍ॅड.राजीव कासावार यांना मात्र वेळोवेळी ‘प्रोजेक्ट’ करण्यात त्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही.
पक्षांतर्गत विरोधक संपल्याने आता वामनराव कासावार निर्धास्त झाले आहे. कॉंग्रेसमधून त्यांना विधानसभेसाठी कुणीच आव्हान देण्याची शक्यता त्यांनीच संपुष्टात आणली आहे. त्यांनी अत्यंत धूर्र्तपणे पावले टाकत पक्षातील विरोधच मोडीत काढला आहे. नाही म्हणायला वणी तालुकाध्यक्षपदी प्रमोद वासेकर आणि शहराध्यक्षपदी ओम ठाकूर यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांची वर्णी लावून त्यांनी नवीन नेतृत्व उदयास आणल्याचा ‘देखावा’ नक्कीच निर्माण केला आहे. मात्र त्यांनाही आमदारांच्या हिरव्या झेंडीशिवाय कोणतीच कामे करता येत नाही. परिणामी कॉंग्रेसमध्ये तूर्तास तरी कासावार हेच एकखांबी नेतृत्व आहे. पक्षात त्यांना आव्हान देणाऱ्यांची संख्या अत्यंत नगण्य आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी त्यांना विशेष परिश्रम घ्यावे लागणार नाही. मात्र पक्षश्रेष्ठींनी जुने उमेदवार बदलण्याचा विचार केल्यास त्यांचा पत्ता कट होऊ शकतो. ते विद्यमान आमदार असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारीची शक्यता आहे.

Web Title: Congress newborn allergy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.