नेत्यांच्या गावातच काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘पानिपत’
By Admin | Updated: July 1, 2014 23:41 IST2014-07-01T23:41:35+5:302014-07-01T23:41:35+5:30
जिल्हा परिषदेच्या लोणी- जवळा सर्कलमधील पोटनिवडणूकीने स्थानिक नेत्यांची ‘पोलखोल’ केली आहे. पिढीजात राजकीय वारसा सांभाळणाऱ्या तरूणतुर्कांनाही आपल्या गावात पक्षाच्या

नेत्यांच्या गावातच काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘पानिपत’
जिल्हा परिषद पोटनिवडणूक : शिवसेनेने ‘लोणी’ पळविले
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या लोणी- जवळा सर्कलमधील पोटनिवडणूकीने स्थानिक नेत्यांची ‘पोलखोल’ केली आहे. पिढीजात राजकीय वारसा सांभाळणाऱ्या तरूणतुर्कांनाही आपल्या गावात पक्षाच्या उमेदवाराला ताकद देता आली नाही. त्यामुळेच या नेत्यांच्या गावात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचे पानिपत झाले.
जिल्ह्याचे सत्ता केंद्र राहीलेले माजी खासदार उत्तमराव पाटील यांचे लोणी गाव याच सर्कलमध्ये आहे. आर्णी पंचायत समितीचे सभापती राजीव विरखेडे, जिल्हा परिषदेचे माजी उपध्यक्ष रामजी आडे, आर्णीचे नगराध्यक्ष अनिल आडे यांचे गाव खेड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजू गावंडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राजन भागवत यांचे गाव म्हसोला येथेसुध्दा शिवसेनेने काँग्रस आणि राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील यांना पिढीजात राजकीय वारसा लाभला आहे. लोणी हे गाव पाटील यांच्यामागे आजपर्यंत प्रत्येक वेळी भक्कमपणे उभे राहीले. मात्र ती पकड मनिष पाटील यांना ठेवता आली नाही. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीतील नेत्यांच्या पंगतीत असलेल्या मनिष पाटील यांच्या गावातच राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहीला. त्याला केवळ १४९ मते मिळाली. यावरू मनिष पाटील यांचे वर्चस्व गावाने झुगारल्याचे सिध्द होते. खेड हे काँग्रेस नेते आणि पदाधिकाऱ्यांचे गाव आहे. येथे राष्ट्रवादीला केवळ १२ तर काँग्रेस उमेदवाराला केवळ ४०९ मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार अजीत राठोड यांना त्यांचे गाव ब्राम्हणवाडा वगळता इतर कोणत्याही गावात आघाडी मिळाली नाही. २१ गावे असलेल्या या जिल्हा परिषद सर्कलमध्ये प्रत्येकच गावातून शिवसेनेच्या प्रवीण शिंदे यांनी लीड घेतला. राष्ट्रवादीची स्थिती तर अपक्ष उमेदवारा प्रमाणे झाली. या उलट शिवसेना उमेदवार प्रवीण शिंदे यांना त्यांच्या पांगरी गावासह दाभडी, म्हसोला येथे भरपूर आघाडी मिळाली.
शिवसेनेच्या नवख्या उमेदवाराने काँग्रेस-राष्ट्रवादीतील दिग्गजांना धुळ चारली. यावरून ही स्टारकास्ट नेतेमंडी जनसामान्यांपासून दुर गेल्याचे दिसून येते. ही निवडणुक आगामी विधानसभेची रंगित तालीम असल्याचे मानले जात होते. तेथे दारूण पराभव झाल्याने जिल्हाभरातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची हूरहूर वाढली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)