काँग्रेस नेत्यांना पक्षासाठी वेळच वेळ

By Admin | Updated: October 20, 2014 23:18 IST2014-10-20T23:18:54+5:302014-10-20T23:18:54+5:30

आतापर्यंत मतदारांसाठी तर सोडाच पक्ष कार्य आणि कार्यकर्त्यांसाठीही उपलब्ध न होणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडे आता वेळच वेळ शिल्लक आहे. जणू निवडणुकीतील पराभवाने त्यांची व्यस्ततेतून

Congress leaders have time to spare for the party | काँग्रेस नेत्यांना पक्षासाठी वेळच वेळ

काँग्रेस नेत्यांना पक्षासाठी वेळच वेळ

पराभवाने मोकळीक : शिवसेना, राष्ट्रवादीलाही संधी, मोदी लाटेने भाजपाला तारले
राजेश निस्ताने - यवतमाळ
आतापर्यंत मतदारांसाठी तर सोडाच पक्ष कार्य आणि कार्यकर्त्यांसाठीही उपलब्ध न होणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडे आता वेळच वेळ शिल्लक आहे. जणू निवडणुकीतील पराभवाने त्यांची व्यस्ततेतून सुटका केली आहे. आता या नेत्यांना पक्ष, कार्यकर्ते आणि मतदारसंघातील समस्यांचे स्मरण होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, वामनराव कासावार, विजय खडसे या नेत्यांचा पराभव झाला. राज्यातील काँग्रेसचा पराभव आणि यवतमाळ मतदारसंघात मुलाचे जप्त झालेले डिपॉझिट याची जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही पदाचा राजीनामा दिला. उपरोक्त नेत्यांकडे आतापर्यंत पक्ष कार्यासाठी पुरेसा वेळ नव्हता. हे नेते वैयक्तिक राजकारणातच अधिक काळ व्यस्त राहत होते. परंतु मतदारांनी या नेत्यांना पराभूत करून अप्रत्यक्षरीत्या पक्ष कार्यासाठी मोकळे सोडले आहे. आपला पराभव नेमका कशामुळे झाला, याचे आत्मचिंतन काँग्रेसच्या या नेत्यांना करावे लागणार आहे. मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले असून त्यांची जागा दाखविली आहे.
जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून ‘आलबेल’ दाखविले जात होते. मात्र प्रत्यक्षात या काँग्रेसला नेत्यांची मनमानी आणि गटबाजीने पोखरले होते. जिल्ह्यातील आमदारांचा एक गट आणि प्रदेशाध्यक्षांचा दुसरा गट अशी स्थिती अखेरपर्यंत पहायला मिळाली. कधी काळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी थेट दिल्लीपर्यंत मोर्चेबांधणी करावी लागलेल्या माणिकराव ठाकरेंना तब्बल सहा वर्ष प्रदेशाध्यक्षपद मिळाले. मात्र या संधीचे त्यांना सोने करता आले नाही. लोकसभेत अवघ्या दोन जागा मिळाल्या तर विधानसभेत यावेळी सुमारे ४० जागांचा फटका काँग्रेसला बसला. विधानसभेतील या कामगिरीच्या तुलनेत माणिकरावांची पक्षस्तरावरील कामगिरीही चांगली राहिलेली नाही. राज्यभर काँग्रेसवर मरगळ आल्याचे चित्र आहे. यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आणि खुद्द प्रदेशाध्यक्ष या जिल्ह्याचे असूनही येथे पक्ष संघटन मजबूत होऊ शकलेले नाही. आजही नेत्यांना निवडणुकांपुरतेच कार्यकर्त्यांचे स्मरण होते. या कार्यकर्त्यांना पदे आणि मानसन्मान देण्यात नेते मंडळी कुठे तरी कमी पडले. त्याचाच परिणाम या नेत्यांना विधानसभा निवडणुकीत भोगावा लागला, असे मानले जाते. किमान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून तरी ही नेते मंडळी काही धडा घेते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भविष्यासाठी या नेत्यांना जिल्ह्यात पक्ष संघटनेची बांधणी करावी लागणार आहे. संघटन मजबूत करण्यासाठी आधी नेत्यांना आपल्यातील गटबाजी आणि वैयक्तिकद्वेषाचे राजकारण थांबवावे लागणार आहे. कार्यकर्ते एकजुटत आहेत, नेतेच त्यांना आपल्या सोईने वापरतात, असा सूर आहे.
काँग्रेस प्रमाणेच भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनासुद्धा संघटनात्मक बांधणीसाठी भरपूर वाव आहे. जिल्ह्यात भाजपाचे पाच उमेदवार निवडून आले असले तरी हा विजय मोदी लाटेचा मानला जात आहे. प्रत्यक्षात जिल्हाभर भाजपाची बांधणी नाहीच, ग्रामीण भागात तर भाजपाला पक्ष कार्यासाठी कार्यकर्ता मिळत नाही, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात भाजपाचा दाखविण्यासाठी असा कोणताही बालेकिल्ला नाही. पाच जागांच्या विजयाने हुरळून न जाता त्याचा फायदा पक्ष बांधणीसाठी करणे भाजपाकडून जनतेला अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही स्थिती या पेक्षा वेगळी नाही. पुसद हा नाईकांच्या रुपाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. यवतमाळात तर राष्ट्रवादीची तब्बल पाचव्या स्थानापर्यंत घसरण झाली आहे. दिग्रसचा अपवाद वगळता बहुतांश मतदारसंघात कमी अधिक प्रमाणात राष्ट्रवादीची हीच स्थिती आहे. यवतमाळात नेत्यांच्या घरासमोर दिसणारी गर्दी त्यांना ईव्हीएममध्ये परावर्तीत करता आली नाही, हे वास्तव आहे. आता या गर्दीतील पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते कोण आणि संधी साधू कोण हे नेत्यांना शोधावे लागणार आहे. भविष्यात स्वबळावर निवडणुका लढवायच्या असेल तर राष्ट्रवादीला जिल्हाभर पक्षाची बांधणी करणे गरजेचे आहे. शिवसेनेने अपेक्षेनुसार आपला दिग्रसचा गड शाबूत राखला आहे. काठावरची लढत सांगणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिवसेनेने आपल्या गतवेळच्या मताधिक्यात ३० हजाराची भर टाकून जोरदार चपराक दिली आहे. यवतमाळातही शिवसेनेचे उमेदवार संतोष ढवळे यांना ५० हजारावर मते मिळाली. मात्र ही मते म्हणजे संपूर्ण शिवसेनेची ताकद असे मानने धोक्याचे होईल, कारण संतोष ढवळे या सामान्य कार्यकर्त्यासाठी मतदारांमध्ये सहानुभूती पहायला मिळाली. ढवळे यांच्या पराभवानंतर हळहळलेला समाज पाहिल्यानंतर ही मते शिवसेनेची नव्हे तर वैयक्तिक ढवळे यांच्या रुग्णसेवा आणि सामाजिक कार्यकर्त्यांची असल्याचे अधोरेखित होते. वणी आणि आर्णीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराने चांगली मते घेतली. सेनेलाही दिग्रस-दारव्हा-नेरच्या बाहेर पक्ष बांधणीसाठी भरपूर वाव असल्याचे या विधानसभा निवडणुकीने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

Web Title: Congress leaders have time to spare for the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.