शहरात काँग्रेस तर ग्रामीणमध्ये सेना

By Admin | Updated: July 1, 2014 01:41 IST2014-07-01T01:41:59+5:302014-07-01T01:41:59+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत ग्रामीणमध्ये शिवसेना तर शहरात काँग्रेसने विजय संपादित केला. जिल्हा परिषदेच्या लोणी-जवळा सर्कलमध्ये

Congress in the city and the army in the village | शहरात काँग्रेस तर ग्रामीणमध्ये सेना

शहरात काँग्रेस तर ग्रामीणमध्ये सेना

पोटनिवडणूक : सामाजिक न्यायमंत्र्यांच्या मतदार संघात पराभव
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत ग्रामीणमध्ये शिवसेना तर शहरात काँग्रेसने विजय संपादित केला. जिल्हा परिषदेच्या लोणी-जवळा सर्कलमध्ये शिवसेनेच्या प्रवीण शिंदे यांनी काँग्रेसचा दारूण पराभव केला. तर यवतमाळ नगरपरिषद प्रभाग तीनमध्ये काँग्रेसच्या उषा दिवटे विजयी झाल्यात. भाजपच्या उमेदवाराचा पुन्हा पराभव करत काँग्रेसने ही जागा कायम राखली.
जिल्हा परिषद आणि यवतमाळ नगरपरिषदेतील दोन्ही जागा काँग्रेस सदस्यांच्या निधनाने रिक्त झाल्या होत्या. विधानसभेपूर्वी या जागेवर निवडणूक होत असल्याने याला रंगीत तालीमचे स्वरूप आले होते. यवतमाळ नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस शहरात एक दिलाने काम करताना प्रथमच दिसली. त्याचा सकारात्क परिणाम विजयाच्या स्वरूपात प्राप्त झाला आहे. याउलट स्थिती सत्तेत असलेल्या भाजपची झाली आहे. या प्रभागामध्ये भाजपाचे तीन नगरसेवक असूनही त्यांचा कोणताच प्रभाव दिसला नाही. भाजपच्या माधुरी नखाते यांना एकाकी लढत द्यावी लागली. या प्रभागाकडे भाजपचा एकही नेता फिरकला नाही. जिल्हाध्यक्षांनी शेवटच्या काही दिवसात येथे मोहीम चालवली. प्रभागात भाजपचे जिल्हा उपध्यक्ष राहतात.
भाजप शहराध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती, नगरपरिषदेतील गटनेते या प्रभागात फिरकलेच नाही. तसेच विद्यमान नगरसेवका विरोधात असलेल्या रोष आणि वैजयंता उगलमुुगले यांच्याशी असलेली सहानुभूती नागरिकांनी मतदानातून व्यक्त केली. काँग्रेसच्या उषा प्रवीण दिवटे यांनी दोन हजार ६० मते घेऊन विजय प्राप्त केला. काँग्रेसने पालिकेतील ११ सदस्य कायम ठेवले आहेत.
जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा विरोधात उभ्या ठाकल्या होत्या. सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांचा मतदार संघ असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. लोकसभा निवडणुकीत माघारलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत कम बॅक करता आले नाही. ज्येष्ठ सदस्य प्रताप राठोड यांच्या निधनाची सहानुभूती काँग्रेस नेत्यांना कॅश करता आली नाही. जिल्हा परिषदेच्या गेल्या वेळी सार्वत्रिक निवडणुकीत प्रताप राठोड यांनी शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांचा पराभव केला होता. आता शिवसेनच्या दुसऱ्या फळीतील उपजिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी तब्बल दोन हजार ४८० मते घेऊन पोटनिवडणुकीत विजय प्राप्त केला. याच मतदार संघातील दाभडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत ‘किसानो से चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता.
त्याची जादू अजूनही कायम असल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आले. ही बाब विधानसभेत सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांची डोकेदुखी ठरणारी आहे. काँग्रेसपासून दुरावलेल्या मतदाराला आपल्या बाजुने वळविण्यासाठी अतिशय कमी कालावधी शिल्लक आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते याच मतदारसंघात आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या लोणी गावातच राष्ट्रवादीला अतिशय कमी मते पडली. त्यामुळे त्यांच्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. नुकतेच विधानपरिषदेवर गेलेल्या आमदार ख्वाजा बेग यांचेही हेच कार्यक्षेत्र आहे. त्यांचा कोणताच प्रभाव या निवडणुकीत दिसला नाही.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Congress in the city and the army in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.