काँग्रेस-भाजपात प्रभाग तीनमध्ये सरळ लढत
By Admin | Updated: June 28, 2014 01:19 IST2014-06-28T01:19:39+5:302014-06-28T01:19:39+5:30
नगरपरिषदेतील प्रभाग तिनमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येथे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारातच सरळ लढत होण्याची चिन्हे आहे.

काँग्रेस-भाजपात प्रभाग तीनमध्ये सरळ लढत
यवतमाळ : नगरपरिषदेतील प्रभाग तिनमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येथे भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारातच सरळ लढत होण्याची चिन्हे आहे. एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात असून, २९ जूनला मतदान होत आहे.
काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंता उगलमुगले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. भाजपने यापूर्वी पराभूत झालेल्या माधुरी नुरचंद नखाते यांना रिंगणात उतरविले आहे तर, काँग्रेसकडून उषा प्रवीण दिवटे या उमेदवार आहे. प्रभाग तीन हा सार्वत्रिक निवडणुकीत चारपैकी तीन सदस्य भाजपचे निवडून आले होते. केवळ वैजयंता उगलमुगले यांनी कोंडी फोडत काँग्रेसला येथे प्रतिनिधित्व मिळवून दिले.
आता पुन्हा ही निवडणूक काँग्रेस विरुध्द भाजप अशीच होत आहे. गेल्या निवडणुकीत हातून गेलेली जागा परत मिळविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात आहे तर, आपली जागा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसकडून घरोघरी प्रचारतंत्राचा वापर केला जात आहे. येथे तिकीट वाटप करताना दोन्ही पक्षांनी जातीय समीकरणावरच भर दिला आहे. दोन्ही उमेदवार खेडूला कुणबी समाजाचे असून येथे या समाजाचे मतदार तुलनेने अधिक आहेत. त्यानंतर वंजारी, माळी, कलार, गुजराती मारवाडी आणि इतर कुणबी अशा जातीय मतदारांची संख्या प्रभावी आहे.
या निवडणुकीत छाया नंदू घुगे या अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. पक्षीय उमेदवारांच्या तुलनेत संपर्कासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तब्बल १३ हजार ७०० मतदार या प्रभागात असून शेवटच्या दोन दिवसात त्यांचा कौल मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.
२९ जूनला मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३० जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. विधानसभेपूर्वी शहरात होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)