कर्नाटकातील घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 23:19 IST2018-05-19T23:19:17+5:302018-05-19T23:19:17+5:30
कर्नाटक राज्यातील असंवैधानिक घटनेचा यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

कर्नाटकातील घटनेचा काँग्रेसतर्फे निषेध
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्नाटक राज्यातील असंवैधानिक घटनेचा यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. राष्ट्रपतींना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेस आणि जनता दल सेक्यूलर पार्टीने बहुमतासाठी संख्याबळाचा विचार करून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. राज्यपालांनी १०४ जागा असलेल्या भाजपाला सरकार स्थापनेसाठी पाचारण करून आपल्या आदर्श लोकशाहीचा खून आणि संविधानाची पायमल्ली केली. या घटनेचा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
लोकांचा संविधानावरील विश्वास उडू नये आणि लोकशाही अबाधित राहील यादृष्टीने योग्य ती कारवाई करावी, असे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनराज चव्हाण, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष सिकंदरभाई शहा, यवतमाळ विधानसभा युवक अध्यक्ष विक्की राऊत, नगरसेविका पल्लवी रामटेके, उषाताई दिवटे, नगरसेवक बबलू देशमुख, छोटू पावडे, साहेबराव खडसे आदी उपस्थित होते.