आॅनलाईन परीक्षा व भरतीने संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 21:51 IST2019-02-23T21:50:56+5:302019-02-23T21:51:25+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची नोकरभरती होणार आहे. मात्र ही भरती घेणारी संस्था कोण असावी हेच अद्याप निश्चित झालेले नाही. आॅनलाईन शैक्षणिक परीक्षा घेणे आणि आॅनलाईन भरती घेणे हे दोन्ही प्रकार सारखेच आहेत का याबाबत बँक सहकार आयुक्तांना मार्गदर्शन मागणार आहे.

आॅनलाईन परीक्षा व भरतीने संभ्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक व शिपायाच्या १४७ जागांची नोकरभरती होणार आहे. मात्र ही भरती घेणारी संस्था कोण असावी हेच अद्याप निश्चित झालेले नाही. आॅनलाईन शैक्षणिक परीक्षा घेणे आणि आॅनलाईन भरती घेणे हे दोन्ही प्रकार सारखेच आहेत का याबाबत बँक सहकार आयुक्तांना मार्गदर्शन मागणार आहे.
जिल्हा बँकेत अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नोकरभरती घेतली जात आहे. एनपीए वाढल्याने मागणीच्या अर्ध्याच जागांची भरती घेण्यास पुण्याच्या सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. ही भरती घेताना १५ जून २०१८ च्या शासन आदेशातील सूचना, शर्ती-अटी, निकषांचे काटेकोर पालन करण्याचे बंधन आहे. बँकेने नोकरभरतीसाठी एजंसी बोलविल्या. नऊ संस्थांचे अर्ज आले. मात्र त्यापैकी चार पात्र ठरू शकतात, त्यात एक दिल्लीची एजंसी आहे. मात्र पात्र ठरणाऱ्या या एजंसीजनी शैक्षणिक कामासाठी आॅनलाईन परीक्षा घेतल्या आहेत. या एजंसीजला नोकरभरतीसाठी आॅनलाईन परीक्षा घेतल्याचा अनुभव नाही. त्यामुळे शैक्षणिक कामासाठी घेतलेली आॅनलाईन परीक्षा नोकरभरतीच्या आॅनलाईन परीक्षेसारखीच गृहित धरावी का याबाबत जिल्हा बँकेत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी बँक आता सहकार आयुक्तांना मार्गदर्शन मागणार आहे.
भरती आचारसंहितेत अडकण्याची भीती
नोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाली असेल तर ती निवडणूक आचारसंहितेत अडकत नाही. मात्र जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. सहकार आयुक्तांकडून परवानगी येईस्तोवर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही भरती लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहे.