एसटी बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ; पुस्तिकेचे होळी
By विलास गावंडे | Updated: September 28, 2023 18:12 IST2023-09-28T18:11:52+5:302023-09-28T18:12:51+5:30
यवतमाळ येथे विविध ठराव मंजूर.

एसटी बँकेच्या वार्षिक सभेत गोंधळ; पुस्तिकेचे होळी
विलास गावंडे, यवतमाळ : स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेची गुरुवारी यवतमाळ येथे झालेली सत्तरवी वार्षिक सभा गोंधळात पार पडली. यावेळी अहवाल पुस्तिका फाडण्यात आली. शिवाय बॅंकेशी काहीही संबंध नसलेल्या लोकांचे फोटो प्रकाशित केल्याचा राग व्यक्त करत होळी करण्यात आली.
येथील टिम्बर भवनात सकाळी १०:३० वाजता सभेला सुरुवात झाली. बँकेचे मुख्य व्यवस्थापक अशोक भोसले यांच्यासह संचालक मंचावर उपस्थित होते. अहवाल वाचनाला सुरुवात होताच गोंधळ सुरू झाला. विविध ठराव मांडत असताना गोंधळ सुरू झाला. सर्व ठराव अवघ्या काही वेळात मंजूर करण्यात आले. अनेकांना आपले मत मांडण्याची संधी मिळाली नाही.
सभा सुरू असताना सभागृहाबाहेर गोंधळ सुरू झाला. काय सुरू आहे हे पाहण्यासाठी काही मंडळी बाहेर आली. अहवाल पुस्तिकेवर नथुराम गोडसे यांच्याशिवाय इतर काही लोकांचे फोटो प्रसिद्ध करण्यात आल्याने पुस्तिकेची होळी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एसटी कामगारांची संघटना असलेल्या कामगार संघटनेकडून हा प्रकार करण्यात आला. ज्यांचा बँकेशी काहीच संबंध नाही, त्यांचा पुस्तिकेवर फोटो छापण्याची आवश्यकता काय, असा प्रश्न या संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी उपस्थित केला. शिवाय सभेत घाईघाईने घेण्यात आलेल्या काही ठरावाविषयी त्यांनी आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांचीही सभेला उपस्थिती होती. सभेत झालेला प्रकार योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या बाबी बँकेसाठी नुकसानकारक असल्याचे ते म्हणाले.