शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक
By Admin | Updated: November 15, 2014 02:08 IST2014-11-15T02:08:03+5:302014-11-15T02:08:03+5:30
निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे.

शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक
संजय भगत महागाव
निसर्गाचा लहरीपणा आणि अपुऱ्या पडलेल्या पावसाने महागाव तालुक्यातील शेती उत्पन्नाची स्थिती अतिशय नाजूक झाली आहे. सोयाबीनच्या उत्पन्नात ९० टक्के तर कपाशीच्या उत्पन्नात ६० टक्के तूट येण्याची शक्यता आहे. यामुळे सधन आणि मध्यम शेतकरीही धास्तावले आहे.
महागाव तालुक्यावर गत काही वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आहे. गतवर्षी ओल्या दुष्काळाने संपूर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला होता. यावर्षीच्या खरीप हंगामाकडून शेतकऱ्यांना मोठी आशा होती. मात्र अपुऱ्या पावसाने निराशा केली. ऐन पेरणीच्या वेळेसच पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यावर आले. त्यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी पेरणी केली तर पीक बहरात असताना किडींनी हल्ला केला. सोयाबीनची तर पुरती वाट लागली. ज्या शेतकऱ्यांना २०० क्ंिवटल सोयाबीन व्हायचे त्यांना केवळ २० क्ंिवटलच उत्पादन झाले. सोयाबीनच्या एका बॅगला ८० किलोही उत्पादन येत नव्हते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उभ्या पिकात जनावरे सोडली.
कपाशीच्या उत्पन्नातही कमालीची घट होत आहे. बोंड परिपक्व होऊन फुटण्याच्या काळात थंडी बेपत्ता आहे. यापूर्वी अपुऱ्या पावसाने पऱ्हाटीची वाढ झाली नाही. पात्या, फुले गळून गेली. त्यामुळे कपाशीच्या उत्पन्नात जवळपास ६० टक्के घट येत आहे. दुष्काळ सदृश परिस्थिती असून कृषी विभागानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात येणारी घट चांगलीच चिंतनीय झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातच काही नाही तर बाजारात येणार कोठून अशी अवस्था झाली आहे. परिणामी रोज चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. शेतातील कोणतीच अवजारे सुरक्षित नाही. रबीचे पीक घेतो म्हटले तरी विजेची समस्या कायम आहे. धरणाचे पाणी अजूनही शेतीला मिळाले नाही. चहुबाजूंनी कोंडी होत आहे. अशा स्थितीत तालुक्यात दुष्काळ घोषित करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.