ग्रामपंचायतींमधील संगणक संच धूळ खात

By Admin | Updated: June 25, 2014 00:42 IST2014-06-25T00:42:39+5:302014-06-25T00:42:39+5:30

ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या.

The computer sets in the Gram Panchayats eat dust | ग्रामपंचायतींमधील संगणक संच धूळ खात

ग्रामपंचायतींमधील संगणक संच धूळ खात

नेर : ग्रामपंचायतींचे कामकाज गतिमान व्हावे, पेपरलेस कारभार व्हावा व ग्रामीण भागातील जनतेला त्वरित सेवा मिळावी या हेतूने ग्रामीण भागात सर्व ग्रामपंचायती कोट्यवधी रुपये खर्चून संगणकीय करण्यात आल्या. याठिकाणी संगणक परिचालकसुद्धा नियुक्त करण्यात आले. असे असले तरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमधील संगणक सध्या धूळ खात असल्याचे दिसून येते.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन सुरू आहे. यामुळे ग्रामपंचायतींमधील संगणकांचा कोणताही उपयोग जनतेसाठी होत असल्याचे दिसून येत नाही. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून ही महत्त्वाकांक्षी योजना ग्रामीण भागात पोहोचविली आहे. परंतु भारनियमनामुळे या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. भारनियमनाचे कारण समोर करून संगणक परिचालकसुद्धा दांड्या मारतात. त्यामुळे ग्रामपंचायतचे दाखले हे हातानेच लिहून देण्यात येत आहे. येथील संगणक आॅपरेटरची नियुक्त्या या संबंधित राजकीय व्यक्तींच्या दबावांतर्गत झाल्या असल्यामुळे संगणकचालकांनाही पुरेसे ज्ञान नाही. अनेक संगणक चालक हे बाहेरगावचे आहेत. त्यामुळे ते आठवड्यातून दोन ते तीनच दिवस मुख्यालयी असतात. ग्रामसेवकच ग्रामपंचायतमध्ये राहात नसल्याने संगणकचालकांनाही विचारणारे येथे कोणी नाही. शासकीय योजना या गावागावात पोहोचाव्या, लोकांना त्वरित सेवा मिळावी या हेतूने राबविण्यात आलेल्या या योजनेत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये संगणक व संगणक चालकांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी या कामी त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. परंतु यामध्येही राजकारण शिरल्याने प्रामाणिक लोकांची भरती झाली नाही. त्यामुळे सध्या तरी ग्रामपंचायतींमधील संगणक हे शोभेची वस्तू बनली आहे. या संगणकांचा सर्वसामान्य ग्रामीण जनतेला कोणताही फायदा होत नसून शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याची भावना सर्वसामान्य जनतेमध्ये आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The computer sets in the Gram Panchayats eat dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.