बंदला संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:07+5:30
मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, यागेश पारवेकर उपस्थित होते.

बंदला संमिश्र प्रतिसाद
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात शुक्रवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला यवतमाळात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वाहतूक व्यवस्थेवर मात्र बंदचा परिणाम जाणवला. परिवहन महामंडळाला २५ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात बंदचे आयोजन करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यापारपेठ बंद करीत बाईक रॅली काढली. बसस्थानक चौकात विविध संघटनांनी पाठिंबा देत सभा घेतली.
मराठवाड्यात तणावाची स्थिती राहिल्याने उमरखेड आगाराने २५ बसफेऱ्या रद्द केल्या. यवतमाळात दुपारनंतर काही दुकाने उघडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी अध्यक्ष रमेश गिरोडकर, माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र तलवारे, प्रवक्ता राजा गणवीर, उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, शहर अध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, यागेश पारवेकर उपस्थित होते. या बंदला संभाजी ब्रिगेड, संताजी तेली संघटना, मराठा सेवा संघ, ऑल इंडिया धनगर समाज, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, प्रहार ऑटोचालक संघटना, कापड व्यापारी संघटना, ओबीसी आरक्षण बचाव समिती, माळी समाज संघटना, भारतीय पिछडा शोषित संघटन, गोर सेना, ऑटो युनियन, मालवाहू वाहतूक, बिरसा मुंडा संघटना, ए.पी.जे, कळंब चौक व्यापारी संघटना, शेतकरी वारकरी, एमआयएम, बिरसा ब्रिगेड शामादादा कोलाम, पेन्शनर कर्मचारी, इन्टक, समता सैनिक दल यांच्यासह ३५ संघटनांनी पाठिंबा दिला होता.
तालुका पातळीवरही निघाले मोर्चे
यवतमाळ शहरात बंदकरिता विविध सामाजिक संघटना एकवटल्या होत्या. तर याच संघटनांच्या स्थानिक शाखांनी सोळाही तालुका पातळीवर बंदचे आयोजन केले होते. वणी, पुसद येथे दुपारी रॅली काढण्यात आली. तर आर्णी, नेर, घाटंजी, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, पांढरकवडा अशा सर्वच तालुक्यांमध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
समर्थक-विरोधक आले आमनेसामने
यवतमाळच्या मारवाडी चौकात बंदचे समर्थक आणि विरोधक आमने सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. काहींनी दुकाने बंद ठेवण्यास नकार देत मोदी-मोदी अशा घोषणाही दिल्या. शहरचे ठाणेदार धनंजय सायरे यांनी वेळीच पोहचून दोन्ही गटांची समजूत काढली.