आठ कोटींच्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याची पोलिसांत तक्रार
By Admin | Updated: December 18, 2014 23:02 IST2014-12-18T23:02:04+5:302014-12-18T23:02:04+5:30
शहरालगतच्या सुमारे १५ ग्रामपंचायतींमध्ये मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या आठ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची चौकशी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांत

आठ कोटींच्या मुद्रांक शुल्क घोटाळ्याची पोलिसांत तक्रार
यवतमाळ : शहरालगतच्या सुमारे १५ ग्रामपंचायतींमध्ये मुद्रांक शुल्कातून मिळालेल्या आठ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याची चौकशी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांत तक्रार देण्यासाठी सुरुवातीला टाळाटाळ केली जात होती. मात्र हिवाळी अधिवेशनात प्रकरण अंगावर येण्याच्या भीतीतून अखेर वडगाव रोड ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
यवतमाळ पंचायत समितीचे तत्कालीन उपसभापती संजय रंगे यांच्या तक्रारीवरून जिल्हा परिषद पंचायत विभागाने मुद्रांक शुल्क घोटाळ्याची चौकशी केली. यामध्ये पाच वर्षाच्या कालावधीत आठ कोटींचा अपहार झाल्याचे पुढे आले आहे. त्यावरून दोषींविरोधात पोलीस तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागातील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारातून मिळणाऱ्या एकूण मुद्रांक शुल्कातील एक टक्का रक्कम ग्रामपंचायतीला मिळते. या रकमेचे संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामे आणि अत्यावश्यक सुविधांवर समान खर्च व्हायला हवा असा शासनाचा दंडक आहे. मात्र यवतमाळ शहरालगतच्या पिंपळगाव, भोसा, लोहारा, यवतमाळ ग्रामीण, वाघापूर यासह सुमारे १५ ग्रामपंचायतींमध्ये २००८ ते २०१३ या पाच वर्षाच्या कालावधीत ही रक्कम सोयीच्या ठिकाणी वापरून अपहार करण्यात आल्याची तक्रार पुराव्यासह जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. त्यावरून पंचायत विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात आली.
चौकशीत काही ग्रामसेवकांनी रेकॉर्ड पुरविले तर काही चौकशीला उपस्थितच राहीले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी रेकॉर्डही पुरविले नाही. अखेर चौकशी अधिकाऱ्यांनी उपलब्ध रेकॉर्डच्या आधारे अहवाल दिला. त्यामध्ये संबंधीत ग्रामपंचायतीत सुमारे आठ कोटी रूपयांचा मुद्रांक शुल्क घोटाळा झाल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब केले. त्यावरून पंचायत विभागातर्फे गुरूवारी याप्रकरणी वडगाव रोड पोलिसात तक्रार देण्यात आली. मात्र वृत्तलिहीस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. (स्थानिक प्रतिनिधी)