पाथ्रटच्या आमझरे परिवाराला ३१ लाख रुपयांची भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST2020-12-13T05:00:00+5:302020-12-13T05:00:01+5:30
दारव्हा तालुक्याच्या पाथ्रट (देवी) येथील निळूनाथ नारायण आमझरे (४०), पत्नी निर्मला (३५) आणि मुलगा यश (१२) हे तिघे ६ ऑगस्ट २०२० रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान, कळंब-राळेगाव मार्गावर रोही अचानक आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. यात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलगा यश याला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथून नागपूरला हलविले.

पाथ्रटच्या आमझरे परिवाराला ३१ लाख रुपयांची भरपाई
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दुचाकी अपघातात मरण पावलेल्या पाथ्रट येथील दाम्पत्याच्या परिवाराला ३१ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई वनविभागाकडून देण्यात आली. वनमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यश (१२) व प्रणय (१५) आमझरे या मुलांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला.
दारव्हा तालुक्याच्या पाथ्रट (देवी) येथील निळूनाथ नारायण आमझरे (४०), पत्नी निर्मला (३५) आणि मुलगा यश (१२) हे तिघे ६ ऑगस्ट २०२० रोजी दुचाकीने राळेगावकडे जात होते. दरम्यान, कळंब-राळेगाव मार्गावर रोही अचानक आडवा आल्याने दुचाकीला अपघात झाला. यात निळूनाथ व त्यांची पत्नी निर्मला यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुलगा यश याला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथून नागपूरला हलविले.
अपघातानंतर जोडमोहा वनक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. रोही या वन्य प्राण्याच्या धडकेमुळेच हा अपघात घडल्याची खात्री केली. कळंब येथील क्षेत्र सहायक एल.के. उपाध्ये यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आणि वैद्यकीय अहवालावरून मृतासह गंभीर जखमीला वनविभागाच्या तरतुदीनुसार भरपाई देण्याचा प्रस्ताव सादर केला.
या प्रस्तावावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ उपवनसंरक्षक विभागाला दिले. जखमी यश आमझरे याच्या उपचारासाठी एक लाख २५ हजार आणि दिवंगत निळूनाथ व त्यांच्या पत्नी निर्मला यांना प्रत्येकी १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. यश व त्याचा भाऊ प्रणय यांच्या नावे हे अर्थसाहाय्य विभागून देण्यात आले. यशच्या उपचारासाठी एक लाख २५ हजार रुपयांचा निधीही देण्यात आला आहे. जिल्ह्यात रोही या वन्य प्राण्यामुळे झालेल्या अपघातात मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात धनादेश सुपूर्द करताना वनमंत्र्यांसह जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ, उपवनसंरक्षक केशव बाभळे आदी उपस्थित होते.