टिपेश्वर अभयारण्यातून अवैध तेंदूपत्ता संकलन
By Admin | Updated: May 31, 2014 23:45 IST2014-05-31T23:45:45+5:302014-05-31T23:45:45+5:30
लगतच्या टिपेश्वर अभयारण्यात विनापरवानगी फिरण्यासही मनाई असताना तेथून अवैधरित्या तेंदूपत्ता संकलन होत आहे. कंत्राटदार आणि कर्मचार्यांच्या संगनमताने होत असलेला हा प्रकार वरिष्ठांच्या

टिपेश्वर अभयारण्यातून अवैध तेंदूपत्ता संकलन
सुधाकर अक्कलवार - घाटंजी
लगतच्या टिपेश्वर अभयारण्यात विनापरवानगी फिरण्यासही मनाई असताना तेथून अवैधरित्या तेंदूपत्ता संकलन होत आहे. कंत्राटदार आणि कर्मचार्यांच्या संगनमताने होत असलेला हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास येऊ नये या विषयी शंका उपस्थितीत केली जात आहे.
घाटंजी आणि पांढरकवडा तालुका क्षेत्र असलेल्या टिपेश्वर अभयारण्य क्षेत्रातील संपत्ती आणि वन्यजीवांना कुठलाही धोका होवू नये यासाठी विविध प्रतिबंध घातले गेले आहे. या क्षेत्रात वसलेल्या गावांचे स्थानांतरण करण्यात आले. वनसंपत्तीला कुठलाही धोका होऊ नये, हा या मागील उद्देश आहे. यावर शासनाने लाखो रुपये खर्ची घातले आहे.
तेंदूपत्ता कंत्राटदारांची मात्र मनमानी सुरू आहे. अभयारण्यापासून तीन किलोमीटर क्षेत्रात तेंदूपत्ता संकलन केंद्र असू नये असा शासन नियम आहे. मात्र कंत्राटदार उजाड गावांच्या नावाखाली संकलन केंद्र घेवून खुलेआम तेंदूपत्ता खरेदी करत आहे.
अभयारण्यापासून हाकेच्या अंतरावरील जांब येथे खुलेआम तेंदूपत्ता आणला जात आहे. मजुरांचा तंदूपत्ता संकलनासाठी अभयारण्य क्षेत्रात खुलेआम संचार होत आहे. जांब बाजार केंद्रावर जवळपास तेंदूपत्ता अभयारण्यातूनच आणला जातो. परिणामी शासनाच्या संपत्तीला बाधा पोहोचत आहे. शिवाय वन्यप्राणी या परिसरातून दुसरीकडे कूच करत आहे. सदर बाब संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्यांना माहीत असूनही ते कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान जांब येथील वनहक्क समितीचे सदस्य सैयद जावेद सैयद अमीर यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. मात्र अजूनही कुणावरही कारवाई झाली नाही. परिणामी सदर अभयारण्यातून अवैधरित्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरूच आहे.