The Cold War between the two congressional groups did not stop | काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना

काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना

ठळक मुद्देकळंबमध्ये समन्वयाचा अभाव : विधानसभा निवडणुकीत फटका बसूनही वेगळ्या चुली

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : विधानसभा निवडणुकीत तालुका काँग्रेसच्या दोन गटांत समन्वयाचा अभाव होता. त्याचा परिणाम काँग्रेस तालुक्यात मोठ्या फरकाने माघारली. सर्वत्र कमळ फुलले. आता निवडणूक संपली, असली तरी काँग्रेसच्या दोन गटातील शीतयुध्द पूर्णविराम घ्यायला तयार नाही.
सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. त्यामुळे शुक्रवारी काँग्रेसच्या एका गटाने तहसीलदारांना निवेदन दिले. असे असताना पुन्हा शनिवारी प्रवीण देशमुख गटाकडून याच विषयावर निवेदन दिले. त्यामुळे तालुक्यातील काँग्रेसच्या दोन गटात अजुनही दिलजमाई झाल्याचे दिसून येत नाही. या दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये असलेले वैर परावभवानंतरही संपायचे नाव घ्यायला तयार नाही.
दोन गटातील कार्यकर्त्यांचे आत्मीय मनोमिलन करण्याची जबाबदारी प्रा.वसंत पुरके यांची आहे, असे मत व्यक्त होत आहे. काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याची गरज आहे. समन्वय नसल्याचा फटका प्रा.पुरके यांना विधानसभेतही बसला. आता तर लवकरच कळंब नगरपंचायतच्या निवडणुकीचे नगारे वाजायला सुुरुवात होणार आहे. या निवडणुकीत तिकीट वाटप करणे काँग्रेससाठी मोठे आव्हानात्मक राहणार आहे. दोन गटातील लोकांनी एकत्र आल्याशिवाय भाजप-सेनेपासून सत्ता हिसकाऊन घेणे कठीण होणार आहे.
गावातूनच पत गमवणारे गावपुढारी कम नेते तालुक्याच्या राजकारणात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याच्याच दबावाला बळी पडत ‘नेतृत्व’ व्यूहरचना आखतात. सामान्य कार्यकर्त्यांच्या भावनेला कुठलीही किंमत दिली जात नाही. त्यामुळे कालपर्यंत जवळ असणारे आज मात्र दुरावले जात आहे. याचा विचार काँगे्रस पक्ष जेवढ्या लवकर करतील तेवढा त्यांचाच फायदा होणार आहे. अन्यथा संघटनात्मक शक्ती नसतानाही भाजपचे कमळ आणि शिवसेनेचा बाण जोराने सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: The Cold War between the two congressional groups did not stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.