पोलीस अधिकाऱ्यांचा रूबाब वाढविणारा कोट इतिहासजमा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2022 05:00 IST2022-02-09T05:00:00+5:302022-02-09T05:00:37+5:30
हा ड्रेस वापरताना क्राॅस बेल्ट, स्कार्प अशा वस्तूंचा पेहरावामध्ये समावेश करण्यात आलेला होता. मानवंदना देताना आणि कवायत करताना हा ड्रेस वापरला जात होता. महासंचालक अथवा कुठली मोठी व्यक्ती आली तर हा ड्रेस परिधान करून त्याला मानवंदना दिली जात होती. यामुळे पोलीस खात्याची गरिमा आणखीनच उंचावली जात होती. मात्र हा पोशाख अनेकांना अवघड वाटत होता. त्याच्या वापरासाठी मोठा खर्च होत होता.

पोलीस अधिकाऱ्यांचा रूबाब वाढविणारा कोट इतिहासजमा !
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पोलिसांचा सर्वाधिक रुबाबदार ड्रेस म्हणून ओळखला जाणारा ट्युनिक ड्रेस आता इतिहासजमा होणार आहे.
पोलीस महासंचालकांनी यासंदर्भातील आदेश काढले आहे. पीएसआय ते डीवायएसपीपर्यंत या ड्रेसवर बंदी घालण्यात आली आहे. त्या जागेवर खाकी ड्रेस वापरावा लागणार आहे.
हा ड्रेस वापरताना क्राॅस बेल्ट, स्कार्प अशा वस्तूंचा पेहरावामध्ये समावेश करण्यात आलेला होता. मानवंदना देताना आणि कवायत करताना हा ड्रेस वापरला जात होता. महासंचालक अथवा कुठली मोठी व्यक्ती आली तर हा ड्रेस परिधान करून त्याला मानवंदना दिली जात होती. यामुळे पोलीस खात्याची गरिमा आणखीनच उंचावली जात होती. मात्र हा पोशाख अनेकांना अवघड वाटत होता. त्याच्या वापरासाठी मोठा खर्च होत होता. आता खाकी ड्रेस आल्याने या खर्चाला ब्रेक लागणार आहे. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस उपअधीक्षकापर्यंत अंमलबजावणी
पोलीस महासंचालकांना पोलीस उपनिरीक्षक ते उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यापर्यंत ट्युनिक ड्रेस कोड बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या प्रवर्गातील अधिकारी खाकी ड्रेसवर कामकाज पार पाडावे लागणार आहे. यावरील पदाकरिता ट्युनिक ड्रेस वापरता येणार आहे.
वापर होता गैरसोयीचा
डिसेंबर ते जानेवारी महिन्यात हा ट्युनिक ड्रेस वापरला जात होता. कवायत आणि मानवंदनेसाठी या ड्रेसचा वापर होत होता. या ड्रेसचा खर्च गणवेश भत्त्यापेक्षा अधिक होता.
मानवंदना देताना तलवारीची सलामी करताना हा ड्रेस अनेकांना अडसर ठरत होता. यामुळे नियमित गणवेश सोप्या पद्धतीने वापरता येणार आहे.
भत्ता १२५० रुपये, खर्च १० हजार
पोलिसांना ट्युनिक ड्रेससाठी केवळ १२५० रुपयाचा भत्ता मिळतो. त्या तुलनेत १० हजार रुपयाचा खर्च त्यांना करावा लागतो. आता हा भुर्दंड पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना कमी करता येणार आहे.
यावेळी करावा लागायचा परिधान
ब्रिटिश काळापासून हा ड्रेस चालत आलेला आहे. थंडीच्या दिवसात या पोशाखाचा वापर होत होता. एसपी अथवा डीआयजी आले तर किंवा कवायत आणि मानवंदनेसाठी ट्युनिक ड्रेस वापरला जात होता.
खाकी ड्रेस वापरावा लागेल
पीएसआय ते डीवायएसपीपर्यंत ट्युनिक ड्रेस वापरला जात होता. त्यावर आता बंदी आली आहे. त्या जागेवर खाकी ड्रेस वापरावा लागणार आहे. डीवायएसपीच्या पुढे मात्र अशा स्वरूपाचे बंधन नाही.
- दिलीप पाटील भुजबळ,
पोलीस अधीक्षक, यवतमाळ
निवृत्त पोलीस अधिकारी म्हणतात...
हा एक सन्मानजनक ड्रेस होता. यामुळे पोलिसांची गरिमा अधिक उठून दिसत होती. ब्रिटिश काळापासून आलेला हा पोषाख सुंदर पोषाख होता. मात्र अलीकडील घेण्यात आलेला निर्णय योग्य नाही.
- गिरीश बोबडे, निवृत्त डीवायएसपी
हा पोषाख त्रासदायक होता. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश काळापासून हा पोषाख वापरला जात होता. पोलीस विभागात घेण्यात आला हा निर्णय योग्य आहे. यामुळे अनेकांना दिलासा मिळेल.
- विलास वांदिले, निवृत्त डीवायएसपी