ढगाळी वातावरणाची धडकी

By Admin | Updated: October 25, 2014 22:46 IST2014-10-25T22:46:50+5:302014-10-25T22:46:50+5:30

एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले.

Cloudy weather shock | ढगाळी वातावरणाची धडकी

ढगाळी वातावरणाची धडकी

संकटाची मालिका : सोयाबीन काढणीचा हंगाम
यवतमाळ : एकापाठोपाठ एक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागचे संकट अद्यापही संपले नाही. ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि कापूस फुटला असताना ढगाळी वातावरण निर्माण झाले. काढलेले सोयाबीन झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा उडत असून या वातावरणाने शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा धडकी भरविली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला सातत्याने बसत आहे. यंदा तर संकटाची मालिकाच सुरू आहे. सुरुवातीला पावसाने दडी मारली. दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यातून वाचलेल्या पिकांवर किडींनी आक्रमण केले. शेंगा भरण्याच्या वेळेस पावसाने पुन्हा दगा दिला. अपरिपक्व शेंगात ज्वारीच्या दाण्याऐवढे सोयाबीन आहे. एकरी दहा पोते व्हायचे तेथे दोन पोतेही होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शेतकरी सोयाबीन काढणीच्या तयारीला लागला. नेमकी हीच वेळ साधून पुन्हा निसर्गाची अवकृपा होत आहे. शुक्रवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले.
आकाशात शनिवारी दिवसभर काळे ढग जमले होते. काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. बदलते वातावरण पाहून शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली. शेतात काढलेला सोयाबीन झाकण्यासाठी धांदल सुरू झाली. आधीच उत्पन्नाची हमी नाही, त्यातच भाड्याने ताडपत्र्या आणून सोयाबीन झाकावे लागत आहे.
सोयाबीन सारखीच कपाशीची स्थिती आहे. पाऊस आल्यास फुटलेले बोंड पावसामुळे मातीत मिसळण्याची भीती आहे. अशा स्थितीत कापूस आणि सोयाबीन आता पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसत आहे.
नव्या सरकारकडून आशा
विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या. लवकरच नवीन सरकार सत्तारुढ होणार आहे. शेतकरी पुरता उद्ध्वस्त झाला असून अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नव्या शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. शासन सोयाबीन, कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला कसे धावून येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Cloudy weather shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.