पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक बंदच

By Admin | Updated: October 3, 2016 00:08 IST2016-10-03T00:08:36+5:302016-10-03T00:08:36+5:30

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे.

Close the toll free number of the crop insurance company | पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक बंदच

पीक विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक बंदच

शेतकरी संभ्रमात : नुकसानीची माहिती ४८ तासात देणे बंधनकारक
विवेक ठाकरे  दारव्हा
नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास त्याची माहिती विमा कंपनीला ४८ तासाच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक गेल्या कित्येक दिवसांपासून प्रतिसाद देत नाही. त्यामुळे अतिपावसाने झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी कशी असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे पडला आहे. जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकरी यामुळे संभ्रमात सापडले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा उतरविला. राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला. यवतमाळ जिल्ह्यासाठी शासनाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी निश्चित केली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती ४८ तासाच्या आत संबंधित केंद्रीय टोल फ्री क्रमांकावर देणे निर्धारित केले आहे. त्यासाठी विमा कंपन्यांचा दूरध्वनी आणि फॅक्स क्रमांक शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून टोल फ्री क्रमांक बंद आहे. सुरुवातीच्या काही दिवसात फॅक्सवरून काही शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारल्या. परंतु आता हा क्रमांकही बंद पडला आहे.
यावर्षी अतिपावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सोयाबीन उद्ध्वस्त झाला असून कपाशी आणि तूर पीकही उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही योजना लाभदायी ठरते. मात्र या योजनेत अवघ्या ४८ तासात माहिती देणे बंधनकारक आहे. त्यातच आता टोल फ्री क्रमांक आणि फॅक्स क्रमांकही बंद पडला आहे. त्यामुळे माहिती सांगावी कुणाला असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडला आहे.
सुरुवातीला पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास झाला. अर्जाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने मुदत वाढवून द्यावी लागली होती. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी विमा काढला. मात्र आता नुकसान होत असताना त्यांचा टोल फ्री क्रमांक बंद असल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.

४४ कोटींचा विमा हप्ता
यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी ४३ कोटी ६५ लाख रुपयांचा विमा हप्ता सदर कंपनीकडे भरला आहे. त्यात कर्जदार एक लाख ३९ हजार ७२५ शेतकऱ्यांनी ३२ कोटी १३ लाख ३२ हजार आणि बिगर कर्जदार एक लाख ४६ हजार ९१ शेतकऱ्यांनी ११ कोटी ५२ लाख ४७ हजार रुपये भरले आहे. आता शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असताना टोल फ्री क्रमांकच बंद आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना
टोल फ्री क्रमांक : १८००२७००४६२
फॅक्स क्रमांक : ०२०-३०५६५१४३

Web Title: Close the toll free number of the crop insurance company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.