अवैध धंदे बंद करा, कायदा व सुव्यवस्था राखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 23:41 IST2018-12-19T23:40:52+5:302018-12-19T23:41:17+5:30
आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा, असे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी उपविभागातील ठाणेदारांना दिले.

अवैध धंदे बंद करा, कायदा व सुव्यवस्था राखा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसायांवर नियंत्रण मिळवून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा, असे आदेश विशेष पोलीस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी उपविभागातील ठाणेदारांना दिले.
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व वाहतूक शाखेच्या वार्षिक निरीक्षणासाठी उपमहानिरीक्षक तरवडे मंगळवारी पुसदला आले होते. त्यांनी उपविभागातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सर्वच ठाणेदारांना त्यांनी अवैध धंद्यावर नियंत्रण मिळवून प्रलंबित गुन्हे तत्काळ उघडकीस आणण्याची सूचना दिली. या बैठकीला उपविभागातील नऊ ठाणेदार उपस्थित होते. त्यांनी प्रत्येकाची स्वतंत्र भेट घेऊन संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगिरीचा आढावा घेतला.
मुली व विद्यार्थिनींची छेडखानी थांबविण्याचे तसेच मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी पालकांना सहकार्य करण्याचेही सूचित केले. सामान्य जनतेला तपास करताना त्रास होणार नाही, याची पोलिसांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही तरवडे यांनी दिले.
मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास विशेष पोलीस उपमहानिरीक्षकांचा ताफा शहरात पोहोचला. प्रथम त्यांना सलामी देण्यात आली. यावेळी अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार धनंजय सायरे, रवींद्रनाथ भंडारे, संजय चौबे, ब्रिजपालसिंह ठाकूर, हनुमंतराव गायकवाड, उन्हाळे, राऊत, लहू टावरे, राठोड, वाहतूक शाखेचे एपीआय धीरज चव्हाण उपस्थित होते.
पुसद एसडीपीओ कार्यालयाचे कौतुक
येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट दिल्यानंतर श्रीकांत तरवडे यांनी परिसराची पाहणी केली. परिसरातील स्वच्छता, रेकॉर्ड व चांगल्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. शेरेबुकात त्यांनी गुड रिमार्क नोंदविला. मात्र येथील वाहतूक शाखेच्या कामकाजाबाबत सर्वसाधारण रिमार्क दिल्याचे सांगितले जाते.