पुसद, उमरखेड शहर आगीच्या घटनांनी हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:00:17+5:30
अरुण नरसिंग हे पत्नीसह ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राहत होते. रविवारी रात्री ते आतील खोलीत तर पत्नी विद्या नरसिंग या दुसऱ्या खोलीत झोपलेल्या होत्या. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक घराला आग लागली. विद्या नरसिंग यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले. परंतु अरुण नरसिंग यांची खोली पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला.

पुसद, उमरखेड शहर आगीच्या घटनांनी हादरले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : घराला अचानक आग लागल्याने एका वृद्धाचा झोपेतच होरपळून मृत्यू झाला. तर संपूर्ण घरही जळून भस्मसात झाले. ही घटना शहरातील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात रविवारी पहाटे घडली. अरुण केशरचंद नरसिंग (६२) असे मृताचे नाव आहे.
अरुण नरसिंग हे पत्नीसह ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राहत होते. रविवारी रात्री ते आतील खोलीत तर पत्नी विद्या नरसिंग या दुसऱ्या खोलीत झोपलेल्या होत्या. मात्र पहाटे ४ वाजताच्या सुमारास अचानक घराला आग लागली. विद्या नरसिंग यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावून आले. परंतु अरुण नरसिंग यांची खोली पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. घराशेजारील रूपेश अग्रवाल, संदीप आहाळे, संतोष आहाळे, निखिल नरसिंग, अनिकेत आहाळे, शैलेष आहाळे यांनी अग्निशमन दलाला बोलावून आग विझविली. त्यानंतर ठाणेदार पी.डी. फाडे हे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. अरुण नरसिंग यांचा जळालेला मृतदेह पोलिसांनी बाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
गाद्यांचे दुकान पेटून २० लाखांचे नुकसान
उमरखेड : येथील पुसद रोडवरील युपीपी काॅलनीलगत फोम गाद्या व पिलो बनविणाऱ्या सिद्धीविनायक ग्रुप नामक दुकानाला रविवारी दुपारी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील यंत्र सामुग्री व कच्चा माल अशा २० लाख रुपयांच्या साहित्याची राखरांगोळी झाली. यावेळी दुकानात कामगार हजर होते. सुदैवाने जीवित हानी टळली. नगरपरिषद अग्नीशमन दलाने आग नियंत्रणात आणली. मात्र दुकान मालक एकनाथ जाधव यांचे मोठे नुकसान झाले आहे.
१५ दिवसांपासून होते उपाशी
या घटनेतील मृतक अरुण नरसिंग हे गेल्या १५ दिवसांपासून उपाशी हाेते. त्यांना अपत्य नाही. त्यामुळे घराला आग लागली की त्यांनी निराशेतून आत्महत्या करण्यासाठी घर पेटविले. याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
हिवरासंगम येथे औषधी दुकान पेटले
हिवरासंगम : येथील भरवस्तीत असलेल्या औषधी दुकानाला आग लागून चार लाख रुपयांचे साहित्य खाक झाले. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. येथील विनायका मेडिकलमधील आगीत फ्रीजचा स्फोट होऊन धुराचे लोळ उसळले होते. सामाजिक कार्यकर्ते खंडेराव कदम यांनी माहूरवरून अग्निशमनची गाडी बोलाविली. मात्र तोपर्यंत दुकान खाक झाले.