शहर स्वच्छतेचे भिजत घोंगडे कायम
By Admin | Updated: April 1, 2015 02:07 IST2015-04-01T02:07:12+5:302015-04-01T02:07:12+5:30
शहरातील स्वच्छता कंत्राटा विरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा ...

शहर स्वच्छतेचे भिजत घोंगडे कायम
यवतमाळ : शहरातील स्वच्छता कंत्राटा विरोधात रोजंदारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका दाखल केली असून यावर जिल्हाधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. तर तात्पूरता कंत्राटाराजवळ कर्मचारीच नसल्याने स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. याच मुद्दावर नरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना सर्वसाधारण सभेत कोंडीत पकडले. मंगळवारी झालेल्या सभेत सफाई कंत्रटावर कोणताच ठोस निर्णय झाला नाही.
आर्थिक वर्षातील शेवटच्या दिवशी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेत सर्वांच्या जिव्हाळ््याचा महत्वपूर्ण स्वच्छता कंत्राटाचा मुद्दा वगळता सर्व विषय मंजूर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांचा स्थगिती आदेश असल्याने कंत्राटाबाबत कोणताच निर्णय झाला नाही. ज्या दोन संस्थाना एक महिन्याचे तात्पूरते सफाई कंत्राट देण्यात आले होते त्यांनी सुध्दा हातवर केले आहे. गेल्या २० दिवसापासून शहरातील घंटागाड्या, नाल्या काढणे बंद आहे. बाबा ताज आणि संत गाडगेबाबा या दोन संस्थाना एक महिन्याचे तात्पूरते कंत्राट देण्यात आले होते. त्यांचीही मुदत संपली आहे. या संस्थानी करारा प्रमाणे कर्मचारी दिले नाही. त्यांची रक्कम कापण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक प्रवीण प्रजापती, गजानन इंगोले यांनी केली. शहरात सध्या अकरा ट्रॅक्टरवर २२ कर्मचारी फिरत आहेत. प्रत्यक्षात कुठेच सफाईचे काम केले जात नाही. अनेक नगरसेवकांनी स्वखर्चातून सफाई कामगारांची व्यवस्था केली आहे. नगरपरिषद प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढावा, अशी एकमुखी मागणी नगरसेवकांनी केली.
यानंतर सभागृहाने प्रभाग एक मधील नालीचे बांधकामाची निविदा, तलावफैैल परिसरात खडीकरण, नेहरू उद्यानाच्या बाजूला गणेश मुर्ती व दुर्गादेवीची मुर्ती विर्सजनासाठी १० लाख रुपयांचा हौद बांधकामाला प्रशासकीय मंजूरी देण्यात आली. शहरातील पथदिवे दुरूस्ती आणि साहित्य पुरवठ्यांच्या कमी दराच्या निविदेला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर विषय क्रमांक पाच ते १२ हे सफाई कंत्राटाशी निगडीत असल्याने त्याला स्थगिती असल्यामुळे कोणतीच चर्चा झाली नाही. सर्वसाधरण सभेला २८ नगरसेवक उपस्थित होते.
(कार्यालय प्रतिनिधी)