नागरिक भोगताहेत नरकयातना
By Admin | Updated: October 8, 2015 02:16 IST2015-10-08T02:16:27+5:302015-10-08T02:16:27+5:30
शहरालगतच्या लोहारा या मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. ग्रामपंचायतींकडून बांधकामासाठी परवानगीही सर्रास दिली जात आहे.

नागरिक भोगताहेत नरकयातना
लोहारा ग्रामपंचायत : सदनिकातील सांडपाण्याचे नियोजनच नाही
यवतमाळ : शहरालगतच्या लोहारा या मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रात सदनिकांची गर्दी वाढली आहे. ग्रामपंचायतींकडून बांधकामासाठी परवानगीही सर्रास दिली जात आहे. मात्र सांडपाणी वाहून जाण्यासाठी कुठल्या उपाययोजना करण्यात आल्या, याची तपासणी केली जात नाही. परिणामी नागरी वसाहतींमध्ये सांडपाण्याचे गटारं तयार झालेले आहेत. या प्रकारातून नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागत आहे. या ग्रामपंचायतीत सत्ताबदल झाला आहे. नवीन पदाधिकारी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे.
या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वॉर्ड क्र.५ मध्ये तर सदर प्रकाराचा कळस झाला आहे. जवळपास सदनिकांचे सांडपाणी खुल्या जागेत सोडून देण्यात आलेले आहे. वाघापूर ते लोहारा या बायपास मार्गावर एका मंगल कार्यालयामागे असलेल्या सदनिकेतून सांडपाण्याचा लोट मुख्य रस्त्याच्या बाजूने वाहतो आहे. अमरावती मार्गावर असलेल्या दोन मोठ्या सदनिकांमधील पाण्यामुळे त्याठिकाणी गटारगंगा तयार झाली आहे. मातोश्रीनगर, महावीरनगर यासह या भागातील इतर वसाहतींमध्ये डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. अमरावती मार्गावर सांडपाणी वाहून जाण्यासाठी मोठमोठ्या नाल्या तयार करण्यात आलेल्या आहे. परंतु त्याचा कुठलाही उपयोग होत नाही. एकवीरा चौकापासून पुढे काही अंतरावर तर या नाल्या अक्षरश: तोडून टाकलेल्या आहेत. बहुतांश भाग अतिक्रमणात आणि गाळाने भरला असल्याने निरूपयोगी ठरत आहे. या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)